पुणे Kothrud Assembly Constituency - लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुण्यात देखील विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार असून, पुण्यातील जागा कोणकोणत्या पक्षाला जाणार हे ठरलेलं नसतानाही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोथरूड मतदारसंघात भाजपाचे नेते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी आपण इच्छुक असल्याचं सांगत महविकस आघाडीचे नेतेमंडळी यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
चंद्रकांत पाटलांना टक्कर? : "कोथरूड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून, या मतदारसंघातून माझे वडील आमदार तसेच मंत्री देखील राहिले आहेत. आता देखील लोकसभेत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळाले आहे, ते पाहता विधानसभेत देखील मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळणार आहे आणि म्हणून कोथरूडच्या विविध प्रश्नांसंदर्भात माहिती घेत मी कोथरूड विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे. तसंच महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची देखील भेट घेतली आहे," असं यावेळी सुतार यांनी सांगितलं.
विधानसभा जिंकणार : "गेल्या पंधरा वर्षापासून कोथरूड विधानसभा मतदारसंघात मी नगरसेवक म्हणून काम करत आहे. काम करत असताना येथील स्थानिक नागरिकांचे प्रश्न तसेच मतदारसंघातील अनेक प्रश्न हे मी सोडवले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनाचा बालेकिल्ला करण्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे आणि ही निवडणूक जिंकणार," असा विश्वास यावेळी सुतार यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीत पुणे कुणाकडं? :विधानसभेच्या जागा वाटपासाठी आता चर्चांना सुरुवात होणार आहे. त्यामुळं प्रत्येकजण तिकीटासाठी फिल्डिंग लावत आहे. पुण्याच्या जागेबाबतही महाविकास आघाडीत मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.