मुंबईRavindra Waikar:मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसंच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र वायकर यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) वायकरांचा विजय मॅनेज? : रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाकडून केला जात आहे. त्याला शिवसेना पक्षाकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. उद्धव ठाकरे यांचा आरोप म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. तसंच रवींद्र वायकर यांनी देखील आपल्याविरोधात कट रचला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र वायकर यांनी आज दादर येथील शिवतीर्थ निवास्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वायकर यांनी लोकसभा निवडणूक निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"मला जेव्हा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी मी राज ठाकरे यांच्या पाठिंब्यासाठी भेट घेतली होती. निवडणुकीत माझा विजय झाला. त्यात मनसेच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं सहकार्य आहे. या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी आज राज ठाकरे यांची भेट घेतली". - रवींद्र वायकर - खासदार, शिवसेना
EVM हॅक करून दाखवा :निकालानंतर रवींद्र वायकर यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादावर राज ठाकरे यांनी काही सांगितलं का? असा प्रश्न वायकर यांना विचारला असता त्यांनी बोलणं टाळलं. मात्र "मोबाईलवरून EVM मशीन हॅक केल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाकडून करण्यात आला आहे. मोबाईलवरून EVM हॅक करता येणं शक्य असल्यास त्यांनी करून दाखवावं. ज्यांना यासंदर्भात न्यायालयात जायचं ते जातील. आपल्या देशात लोकशाही आहे. ही माझी 18 वी निवडणूक आहे. त्यामुळं मतमोजणी वेळी नियम, कायदे काय असतात याची मला देखील माहिती आहे, " असं वायकर म्हणाले.
त्यांच्यासारखा अल्कोहोलिक नाही :पुढं बोलताना वायकर म्हणाले,"या प्रकरणाचा तपास झाल्यास त्यांच्या लोकांकडे मतदान केंद्रात असलेले मोबाईल देखील समोर येईल. आगोदर निवडणूक आयोगानं 2 हजार 200 मतांनी अमोल कीर्तीकरांचा विजय झाल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, त्यावेळी तब्बल एक लाखांहून अधिक मतांची मोजणी बाकी होती. त्यामुळं तात्काळ मतमोजणी केंद्रावर जाऊन मी याबाबत विचारणा केली. त्यानंतर 48 मतांनी माझा विजय झाल्याची घोषणा करण्यात आली. यावर कुणी आक्षेप घेत, असेल तर तो त्यांचा हक्क आहे. मी त्यांच्यासारखा अल्कोहोलिक नाही, वर्कहोलिक आहे."
'हे' वाचलंत का :
- ''शिवसेना फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं आक्रमण..'' राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल - Sanjay Raut
- मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार? - Maharashtra Politics
- राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? प्रियंका गांधी निवडणूक लढवण्यामागं काँग्रेसची काय आहे रणनीती? - Rahul Gandhi To Push Congress in UP