ठाणे Akshay Shinde Encounter : ऑगस्ट महिन्यात बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले. 20 ऑगस्टला बदलापूर रेल्वे स्थानकात बदलापूरकरांनी मोठं आंदोलन करत दहा तास रेल्वे थांबून ठेवली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सोमवारी अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ उलट अक्षयवर गोळीबार केला. यात अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर बदलापुरात पीडित मुलीला न्याय मिळाला. म्हणून बदलापूरकरांनी तसेच शिवसेनेनं पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष केला.
चिमुकलीला न्याय मिळाला : अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना बदलापूर रेल्वे स्थानक इथं आरोपीला फाशी द्या म्हणून आंदोलन करण्यात आलं. त्याच बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी आरोपीच्या विरोधात घोषणाबाजी केली तर राज्य सरकारचं अभिनंदन केलं. यावेळी हातात फलक धरत आणि पेढे वाटत आंदोलकांनी जल्लोष केला. दरम्यान "अरे मेला मेला नराधम मेला.. चिमुकलीला न्याय मिळाला, नराधमाला शिक्षा झालीच, शिंदे सरकारचं अभिनंदन, अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.