महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विठ्ठल कारखान्यावर शिखर बँकेची कारवाई, चेअरमन अभिजित पाटील राजकीय भूमिका बदलण्याच्या तयारीत? - Shikhar Bank Action In Pandharpur - SHIKHAR BANK ACTION IN PANDHARPUR

Shikhar Bank Action At Pandharpur : पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती काल शुक्रवारी (26 एप्रिल) महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाई केली होती. 'शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील साखरेचा साठाही बँकेने जप्त केला होता. शिवाय बँकेने गोदामाला देखील टाळे ठोकले होते. जप्तीची कारवाई केल्यानंतर शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारखाना सील केला होता.

Shikhar Bank Action At Pandharpur
चेअरमन अभिजित पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 10:24 PM IST

साखर कारखान्यावरील माहिती प्रकरणी अभिजित पाटील आपले मत मांडताना

सोलापूरShikhar Bank Action At Pandharpur: कारखान्याने शिखर बँकेचे पैसे न भरल्याने काही दिवसांपूर्वी बँकेने कारवाई सुरू केली होती. न्यायालयात जाऊन अभिजित पाटील यांनी कारवाईला स्थगिती मिळविली होती; परंतु काल ही स्थगिती उठली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल कारखान्यावर कारवाई केल्याने अभिजित पाटील अडचणीत आले आहेत. त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हे राजकीय भूमिका बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या संदर्भात आज विठ्ठल कारखान्यावरती कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेऊन अभिजित पाटील यांनी आपली राजकीय भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली. त्यामुळे आज सकाळपर्यंत शरद पवार यांच्याबरोबर उपस्थित असणारे अभिजित पाटील हे कारखाना वाचवण्यासाठी आपली राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेला कार्यकर्त्यांमधूनही दुजोरा दिला जात आहे.

कारखाना वाचवीन- अभिजित पाटील :माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या (28 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून त्या दौऱ्यामध्ये विठ्ठलचे चेअरमन आणि शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी अभिजित पाटील यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावरती शरद पवार यांच्या प्रचारसभेत, "मी स्वतःला गहाण ठेवीन पण कारखाना वाचवीन", असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता जोर धरू लागली आहे.

हा तर भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय :सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी बंड केल्याने आणि मोहिते पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतल्याने शरद पवार गटाला मोठी ताकद मिळाली होती. मोहिते पाटील यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये अभिजित पाटील हे सक्रिय झाले होते आणि त्यांचा गट माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये नेटाने प्रचार करू लागला होता. कारखान्यावरती झालेल्या कारवाईने अभिजित पाटील यांना भूमिका बदलावी लागत असल्याने आता कार्यकर्त्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे. अभिजित पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच झालेल्या निवडणुकीमध्ये हा बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिंकला होता.

अभिजित पाटील हे राजकीय भूमिका बदलणार? :अभिजित पाटील यांनी काटकसरीने कारभार करत कारखाना उत्तम रीतीने चालवत सभासदांचे पाठीमागील राहिलेली देणेही देत यावर्षीचा कारखान्याचा हंगाम 10 लाख 80 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून यशस्वी केला होता. सन 2023-24 या ऊस गाळप हंगामामध्ये त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची चांगली स्पर्धा निर्माण केली होती. त्यांच्यामुळेच ऊस उत्पादक सभासदांना ऊसाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे कारखाना वाचविण्यासाठी अभिजित पाटील हे राजकीय भूमिका बदलणार का? याकडेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जर अभिजित पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर शरद पवार यांनी मोहिते पाटील यांचा टाकलेला डाव देवेंद्र फडणवीस अभिजित पाटील यांच्या रूपाने तो परतवून लावणार असल्याचे चित्र दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. "स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही तो..."; विनायक राऊतांची नारायण राणेंवर बोचरी टीका - Lok Sabha Election 2024
  2. "...हे पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?", कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह ठाकरे गटावर हल्लाबोल - PM Narendra Modi
  3. लोकसभा उमेदवारीवरून मुस्लिम समाजाचे नेते नाराज, मुस्लिम मतं कुणाच्या पारड्यात? जाणून घ्या राजकीय समीकरण - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details