सातारा Sharad Pawar visit Satara - खासदार शरद पवार रविवारी (२२ सप्टेंबर) रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विश्रामगृहात जिल्ह्याचा राजकीय आढावा घेणार आहेत. त्यामुळे थोरल्या साहेबांच्या दौऱ्यात राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. या दौऱ्याकडं भाजपा आणि अजितदादा गटाचं देखील लक्ष असणार आहे.
कृष्णाकाठावर होणार राजकीय खलबतं
साताऱ्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून शरद पवार दुपारी थोर विचारवंत दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या रेठरे बुद्रुकला जाणार आहेत. त्याठिकाणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. रेठरे बुद्रुक हे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचे देखील माहेर आहे. त्यामुळे कृष्णा काठावर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडं कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचं लक्ष लागून आहे.