सातारा : कराड उत्तरमधील मतदारांनी मला 25 वर्षे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. या काळात काँग्रेस, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, या सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची माझी भूमिका राहिली आहे, असं वक्तव्य माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं. या वक्तव्यातून त्यांनी आपल्या विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. परंतु, शरद पवार गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का, या चर्चेला सुद्धा अधिकच जोर आला आहे.
'कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे' :राज्यातील सर्वच पक्षांशी, नेत्यांशी व्यक्तिशः माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत, असं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. "यशवंतरावांचा विचार सोडायचा नाही, ही आपली भूमिका आहे. आज आपल्याला काळ उलटा लागला असला तरी 'कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे', असं होत राहतं. विधानसभेचा निकाल आपण स्वीकारला आहे. एवढं बहुमत कसं? बहुमत मिळूनही जल्लोष का नाही? अशी चर्चाही झाली. परंतु, निकालादिवशी मी अर्ध्या तासातच जनमताचा कौल स्वीकारला होता," असंही त्यांनी सांगितलं.
'सहकारा'वर विश्वास ठेऊन 'सहकार्य' करा :"आपण नियमानं काम करतो. त्यामुळं शासकीय पातळीवर काही अडचणी येतील, अशी परिस्थिती नाही," असंही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच "सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे. कारखान्याच्या माध्यमातून पुढील पन्नास वर्षांत सर्वांच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडेल. आपण सर्वांनी सहकारावर विश्वास ठेऊन सहकार्य करावं," असं आवाहन त्यांनी केलं.