नागपूर : बदलापूर इथल्या शाळेत दोन चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक होता. मी सुरुवातीपासूनच या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात आली, त्याचा अहवाल समोर आला आहे. यात पाच पोलीस दोषी असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयानं दिला. यामुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कोणाला वाचवण्यासाठी करण्यात आला ? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली. ते नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अक्षयवर गोळीबार का केला ? : "बदलापूर प्रकरण घडल्यानंतर मी पत्रकार परिषद घेवून याबाबत सांगितलं होतं. पोलिसांजवळ बंदुक ही नेहमी लॉक असते. ते लॉक खोलण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. न्यायालयीन चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यात प्रामुख्यानं पोलिसांची बंदुक घेवून अक्षय शिंदे यानं पोलिसांवर गोळीबार केला. त्यावर अक्षय शिंदेचे ठसे मिळुन आले नाहीत, असा अहवाल फॉरेन्सिक टीमनं दिला. यामुळे त्यानं पोलिसांवर गोळीबार केला नाही, ही बाब समोर येते. त्यामुळेच त्याचे ठसे हे त्यानं गोळीबार केलेल्या बंदुकीवर मिळून आले नाहीत. त्यानं पोलिसांवर गोळीबार केलाच नाही, तर मग पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी अक्षयवर गोळीबार का केला ?," असा प्रश्न सुद्धा अनिल देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.
कोणाला वाचवण्यासाठी केला एन्काऊंटर : "बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली, ती भाजपाच्या एका बड्या नेत्याची आहे. यामुळेच सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करण्यात आले. पीडित मुलीच्या गर्भवती आईला 13 तास पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी ताटकळत ठेवलं. नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर शाळेच्या संचालकावर संशय आल्यानं तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना वाचवण्यासाठी तर हा एन्काऊंटर करण्यात आला नाही ना? यामुळे एन्काऊंटर कोणाच्या सांगण्यावरुन केला? कोणाला वाचवण्यासाठी केला ? हा सुद्धा महत्वाचा विषय आहे," असं त्यांनी सांगितलं.
अनेक धक्कादायक खुलासे होतील : न्यायालयीन चौकशी अवालानंतर न्यायालयानं पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचंही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
हेही वाचा :