मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याहस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. त्यासह शिवसेना नेत्यांनीही संजय राऊतांवर हल्लाबोल केला. शिवसेना आमदार शायना एन सी यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा 'डस्टबीन'मध्ये टाकणाऱ्यांनाच शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिल्याची अडचण आहे. संजय राऊत दिवसांची सुरुवात विनोदानं करतात, असा टोलाही शायना एनसी यांनी यावेळी लगावला.
बाळासाहेबांची विचारधारा टाकली कचरापेटीत :शिवसेना नेत्या शायना एनसी म्हणाल्या, "संजय राऊत रोज दिवसाची सुरुवात विनोदानं करतात. राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मराठी मातीतील मुलगा म्हणून देण्यात आला. दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिल्याबद्दल संजय राऊत यांना मोठी अडचण झाली आहे. सत्ता मिळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला 'डस्टबीन'मध्ये फेकून देणारे आपणच आहोत, हे संजय राऊत विसरले आहेत."
काय म्हणाले होते संजय राऊत :दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. मात्र शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे बिथरलेल्या संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. "शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचाच सत्कार केला. गद्दारांना असा सन्मान देणं हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. ठाण्याचा विकास शिवसेनेनं केला. शरद पवारांना ठाण्याबाबत चुकीची माहिती आहे. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन नाही, तर राजकीय दलाली सुरू आहे. आता शिंदेसारखे आंतरराष्ट्रीय दलाल शरद पवारांसोबत आहेत. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आपण महाराष्ट्राचे शत्रू मानतो. शिवसेना तोडून महाराष्ट्र कमजोर केलेल्यांचा तुम्ही सन्मान केला. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच वेदना झाल्या. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण कळते," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा :
- अरविंद सावंतांच्या बोलण्यात व्यक्तिगत हल्ला दिसला नाही, शायना एनसी प्रकरणी शरद पवारांनी केली पाठराखण
- "आम्हालाही राजकारण कळतं पवार साहेब"- एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यानं संजय राऊतांचा हल्लाबोल, नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
- संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "संबंध जोडायचे हे पवार साहेबांनी..."