मतदार नोंदणीसाठी तब्बल ४६२ बोगस ऑनलाईन अर्ज, संशयित पोलिसांच्या ताब्यात - SATARA CRIME NEWS
विधानसभा निवडणुकीच्या तोंडार मतदार नोंदणीसाठी बोगस ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. ४६२ बोगस ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published : Oct 9, 2024, 9:41 AM IST
सातारा- गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुमारे ३० अर्ज केल्याची घटना ताजी असतानाच आता कराड उत्तरमधील मतदार नोंदणीत देखील तसाच प्रकार समोर आलाय. वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीनं मतदार नोंदणीसाठी तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज केले आहेत. याप्रकरणी निवडणूक शाखेनं गुन्हा दाखल केला. कराड शहर पोलिसांनी संशयित अविनाश विजय धर्मे याला ताब्यात घेतलं आहे.
वीज ग्राहक क्रमांकात खाडाखोड करून जोडले पुरावे-संशयितानं निवडणूक आयोगाच्या पोर्टल आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणीअंतर्गत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी आणि स्थलांतरित अर्ज सुविधेचा गैरवापर केला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात नमुना आठ या अर्जाद्वारे अविनाश धर्मे या व्यक्तीनं स्थलांतर दाखवून पोर्टलमध्ये ४६२ अर्ज दाखल केले आहेत. अर्जासोबत रहिवासाबाबतचा पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी (रा. हजारमाची, ता. कराड) यांचे वीज देयक व त्यावरील ग्राहक क्रमांकाच्या अखेरच्या चार अंकामध्ये व्हाइटनरचा वापर करून खाडाखोड केली आहे.
लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींचा भंग-पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली खाडाखोड केलेले हे वीज देयक ऑनलाईन अपलोड केले आहेत. निवडणूक शाखेने कागदपत्रांची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली. याप्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम ३१ या कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा नोंद केला. कराड शहर पोलिसांनी संशयित अविनाश धर्मे यास ताब्यात घेतले आहे. सध्या कराड शहर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
कराड दक्षिणमध्येही बोगस मतदार नोंदी-कराड दक्षिण विधानसभा निवडणूक ही राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरणार आहे. या मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सध्या त्यावर तक्रारी दाखल होत असून तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक शाखा सखोल चौकशी करत आहे. लवकरच कराड दक्षिणमध्येही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोगल मतदार अर्जाचा प्रकार समोर आल्यानं राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे.