नागपूर : करिअर मार्गदर्शनच्या नावाखाली नागपुरातील एका मानसोपचार तज्ज्ञानं अनेक मुलींच लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली. या मानसोपचार तज्ज्ञानं अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपी विरुद्ध आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आता मानसोपचार तज्ज्ञाच्या पत्नीलाही सहआरोपी बनवलं आहे. तिचा पती समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुणींचा लैंगिक छळ करत असल्याचं तिला माहीत असूनही या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी काहीच करत नव्हती. यामुळे पोलिसांनी तिला आरोपी बनवलं आहे. दरम्यान तिचा याप्रकरणी आणखी किती सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
मानसोपचार तज्ज्ञानं केलं तरुणींचं लैंगिक शोषण : आरोपी मानसोपचार तज्ज्ञ हा अनेक वर्षांपासून नागपूर शहरात समुपदेशन केंद्र चालवत आहे. तो नागपूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये करिअर मार्गदर्शन संदर्भातील शिबिर घेत होता. त्यामुळे त्याच्याकडं मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या करियर संबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला येत होते. त्यापैकीच काही अल्पवयीन मुली आणि तरुणींचं त्यानं विविध आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर आरोपी अल्पवयीन मुली आणि तरुणींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ स्वतःकडं संग्रहित ठेवायचा. त्यानंतर त्याच्या आधारे पुढं तरुणींना ब्लॅकमेल करायचा, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणाचा असा झाला भांडाफोड : गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आरोपीनं सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडं आलेल्या एका तरुणीला तिचे त्या काळचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणं सुरू केलं. त्याच्या सततच्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या सबंधित तरुणीनं हिम्मत करून पोलिसांकडं तक्रार केली. तेव्हा पहिल्यांदा या विकृत मानसोपचार तज्ज्ञाच्या अनेक वर्षांच्या कुकृत्याचा भांडाफोड झाला.
आरोपीच्या कार्यालयातून हार्ड डिस्क जप्त : पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवत आरोप लागलेल्या मानसोपचार तज्ज्ञाला पॉक्सो आणि लैंगिक छळाच्या आरोपात अटक केली. ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला त्यावेळी धक्कादायक खुलासे होऊ लागले. पोलिसांना तपासादरम्यान मिळालेले पुरावे आणखी धक्कादायक आहेत. त्यामुळे प्रकरण किती गंभीर आहे, हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी आरोपी मानसोपचार तज्ज्ञाच्या कार्यालयातून एक हार्ड डिस्क जप्त केली असून त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आढळल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
तक्रारींची संख्या तीन वर, पोलिसांकडून पीडित तरुणींना संपर्क : आरोपी मानसोपचार तज्ज्ञानं करीअर मार्गदर्शनाच्या नावाखाली आजवर अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत अनैतिक गैरकृत्य केलं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या अनेक वर्षात या मानसोपचार तज्ज्ञाकडं येणाऱ्या विद्यार्थिनींची यादी बनवत त्यांच्याशी संपर्क करणं सुरू केलं आहे. त्याच प्रक्रियेत चार जानेवारीला आणखी दोघींना पोलिसांनी हिम्मत दिल्यामुळे याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत आरोपी मानसोपचार तज्ज्ञाविरोधात लैंगिक छळाचे एकूण तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
म्हणून आरोपीचं नाव जाहीर करता येणार नाही : प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी "या प्रकरणी महिला पोलीस अधिकारी, महिला आणि बालकल्याण अधिकारी तसेच काही महिला काउंसलरचा समावेश असलेली विशेष समिती गठित केली आहे. ही विशेष समिती याप्रकरणी आणखी काही तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळाच्या घटना घडल्या आहेत, का याचा शोध घेत आहे. आता बहुतांश त्यांच्या जीवनात लग्न करून सुखी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे आरोपी मानसोपचार तज्ज्ञाचं नाव आणि त्याच्या समुपदेशन केंद्राची माहिती या क्षणाला जाहीर केल्यामुळे अनेकांचं आयुष्य उध्वस्त होऊ शकते. म्हणून पोलिसांनी अद्याप आरोपीचं नाव जाहीर केलेलं नाही."
हेही वाचा :