नाशिक MP Sanjay Raut on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जातानाचा जुना फोटो ट्विट केलाय. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. "तुम्ही नागपूर रेल्वे स्टेशनला फिरायला गेले होते का? शिवसेनेचं योगदान अयोध्येसाठी किती आहे, हे देशाला सांगण्याची गरज नाही. आमचा शिवसैनिक बाबरीच्या घुमटावर होता" असं व्यक्तव्य त्यांनी केलंय. ते आज नाशिक दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे 22 आणि 23 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त खासदार राऊत हे नाशिकला आले आहेत.
कसा असेल उद्धव ठाकरे यांचा दौरा : उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या आधी संजय राऊतांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. उद्धव ठाकरे गटाचे सर्व नेते आज नाशिकमध्ये पोहचणार आहेत. 22 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर ते थेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकात अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. तिथं ते लोकांशी संवाद साधून श्री काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजन करतील. खासदार राऊत म्हणाले, " गोदावरी तीरावर ते आरती करतील. 22 जानेवारीला भाजपाचा अयोध्येत कार्यक्रम होतोय. पण आमच्यासाठी तो अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. एक पक्ष राजकारण करत असला तरी आम्ही अस्मितेनं नाशिकला काळाराम मंदिरात कार्यक्रम करत आहोत", असं राऊतांनी म्हटलंय.
राष्ट्रपतींना दिलं आमंत्रण : पुढं बोलताना राऊत म्हणाले, "आम्ही गोदातीरावर आरती करणार आहोत. याआधी आम्ही अशी आरती शरयू तीरीही केलीय. भाजपाचे लोक विचारात की तुमचा अयोध्येशी काय संबंध? पण आरतीची सुरुवात आम्ही केली. हे राष्ट्रीय सोहळे आहे. त्यामुळं आम्ही आवाहन केलंय. सर्वांनी यात सहभागी व्हावं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही रीतसर आमंत्रण दिलं. त्यांना अयोध्येत आमंत्रण नसंल तर त्यांनी यावं. सोमनाथ मंदिर झाले तेव्हा राष्ट्रपती यांना आमंत्रण होतं."