मुंबई :गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचे पडसाद आता एसटी वाहतुकीवर देखील उमटू लागले आहेत. शुक्रवारी (21 फेब्रुवारी) रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर हल्ला केला. कर्नाटक हद्दीतील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे एसटीला आणि एसटी चालकाला काळं फासण्यात आलं. या घटनेनंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसेसना काळं फासत उत्तर दिलं. यावरच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले संजय राऊत? :"बेळगावमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घ्यावी. बेळगाव सीमा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. तरीही कर्नाटक सरकारकडून अशी कृती केली जात आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. आपल्या लोकांवर हल्ला करणं, मराठी शाळा आणि साहित्य संस्था बंद करणं यासारख्या कारवाया का सुरू आहेत? महाराष्ट्रातही कर्नाटकातील अनेक लोक आहेत जे अनेक संस्था आणि हॉटेल चालवताय. आम्ही त्यांना कधीही काहीही केलं नाही आणि करणारही नाही. आम्ही सर्वजण एक आहोत. हा भाषेचा मुद्दा आहे. बेळगावमध्ये राहणारे मराठी लोक तिथं मराठी शाळा चालवू इच्छितात, तर त्यात काहीही गैर नाही," असं संजय राऊत म्हणाले.