मुंबई : भाजपासोबत जाण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पाच बैठका झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र या बैठकीत शरद पवार नसल्याचं त्यांनी मुंबईत सांगितलं. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या अजित पवार यांचा दावा खरा की, संजय राऊत सांगतात तो दावा खरा, यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.
पैसे पोहोचवायचे तिथे पोहोचले :याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी अदानींसोबत हातमिळवणी केली असती तर आमचं सरकार पडलं नसतं. सरकार पाडण्यासाठी अदानी, अमित शाह, अजित पवार, देवेंद्र फडवणीस यांच्यात वारंवार बैठका झाल्या. परंतु या बैठकांना अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणं शरद पवार नाही तर अजित पवारच उपस्थित होते. गौतम अदानी यांना मुंबईवर कब्जा करण्यासाठी ठाकरे सरकार पाडण्यात आलं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली," असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर "आम्ही गौतम अदानींसोबत जर का हातमिळवणी केली असती, तर आमच्या बॅगेतही पैसे सापडले असते. परंतु दुसरीकडं जिकडं पैसे पोहोचवायचे होते तिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी ते पोहचवले आहेत. पैशांचे वाटप व्यवस्थित सुरू असून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंचं वाटप सुद्धा सुरू आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला.
अदानींनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस :शरद पवारांनी शिवसेनेत फूट पाडली, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा, त्यांनी मंडल आयोगाचं कारण दिलं. परंतु आता ते विसरले नसतील, असं मला वाटतं. गौतम अदानी यांना मुंबई लुटायची आहे आणि त्यासाठी शिवसेना हा सर्वात मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली," असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही गौतम अदानी यांनी फोडली, असं खुद्द अजित पवार यांनी मान्य केलं असं, संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोगावर दबाव :सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत बॅग तपासणीवरुन राजकारण तापलं आहे. त्यात उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची सतत दोन वेळा बॅग तपासणी करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा बॅग तपासणीचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो विमानतळावरचा आहे. विमानतळावर सर्वांच्या बॅगा तपासल्या जातात. पंतप्रधान जरी गेले तरी सुद्धा त्यांच्या बॅगेची तपासणी केली जाते. म्हणून हे लोक काय बोलतात ते त्यांना समजत नाही. म्हणून निवडणूक आयोग हे शाह आणि फडणवीस यांच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा :
- राज ठाकरे हे दुसरे मोरारजी देसाई; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार? Matrize च्या सर्व्हेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...
- "सदाभाऊ खोताच्या बापाने...;" शरद पवारांवरील टीकेवरून संजय राऊत संतापले; म्हणाले...