मुंबई :मुंबई महापालिका देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. मुंबई महापालिकेवर गेली अडीच दशकं शिवसेनेची एकहाती (एकसंध) सत्ता राहिली आहे. मागील 30 वर्षाच्या कालावधीत केवळ दोन वेळचा अपवाद सोडला, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर एकछत्री अंमल कायम ठेवला आहे. या अगोदरच्या महापालिका निवडणुकीत भाजपानं शिवसेनेची ही अनभिषिक्त मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. आपला महापौर कायम ठेवण्यात शिवसेनेनं यश मिळवलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन वेगळा गट नव्हे तर पक्षाचं नाव, निवडणूक कायदेशीर पद्धतीनं मिळवल्यानंतर मात्र महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी बदलली आहे. आता शिवसेना (उबाठा) पक्षाला महापालिकेतील सत्ता टिकवणं वाटतं तितकं सोपं राहिलं नाही. या परिस्थितीत, आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढेल, असं वक्तव्य शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेंदूतील गोष्टी संजय राऊत यांच्या तोंडून बाहेर पडतात, असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं. अर्थात या मुद्यावर थोडी सावध भूमिका घेत राऊत यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना (उबाठा) ने स्वबळावर लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची सारवासारव केली आहे. मात्र संजय राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई महापालिका उबाठा लढवणार स्वबळावर :याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की,"मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळावर लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून आम्ही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर तर इतर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. मुंबई महापालिकेत शिवसेना हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे काहीही करुन आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. नाहीतर मुंबई वेगळी होईल. सध्या मुंबईत मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. ते पाहिलं तर आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणं गरजेचं आहे." थोडक्यात महाविकास आघाडीतला घटक पक्ष असूनही मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याबाबतची पक्षाची भूमिका परस्पर जाहीर करून टाकली. दरम्यान, शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मैदानात उतरत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरु करत स्वबळावर लढण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.