मुंबई Sanjay Raut News today: दिल्लीतील निती आयोगाचा बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माईक बंद करण्यात आला. त्यांना बोलू दिलं नाही. यामुळे देशभरात चांगलंच राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही या बैठकीतून काही मिळाले नसल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
मोदी - शाह यांच्या गुजरातमधून पैसा येत नाही:खासदार राऊत म्हणाले, " ज्या पद्धतीने बजेट तयार करण्यात आलं, त्याच पद्धतीनं निती आयोग काम करतो. भाजपाची सत्ता असलेल्या ठिकाणी पैसे देण्याचं काम करण्यात आलं आहे. म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या बैठकीत बोलू दिलं नाही. त्यांचा माईक बंद करून त्यांना अपमानित करणं, हे लोकतंत्रात शोभत नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत आमचेसुद्धा माईक बंद केली जातात. केंद्र सरकार आपली खुर्ची वाचवण्यासाठी आंध्रप्रदेश आणि बिहारला भरभरून निधी देत आहे. हा अधिकार सर्व राज्यांचा आहे. वाटण्यात येणारा पैसा देशातील जनतेचा आहे. टॅक्सच्या माध्यमातून उभा झालेला पैसा आहे. तो मोदी आणि शाह यांच्या गुजरातमधून येत नाही." राज्याला कमी निधी मिळत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. " या बैठकीत महाराष्ट्राला काय भेटलं? मुख्यमंत्री गेले आणि दाढीवर हात फिरवून परत आले, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
पवार, फडणवीस, शिंदे यांच्या नाट्यसृष्टीनं महाराष्ट्राचं नुकसान:अजित पवार यांनी सत्तेत सामील होताना अमित शाह यांच्याबरोबर दहावेळा बैठक घेतल्याचं वक्तव्य केलं. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कधी उडी घालून, कधी फर कॅप घालून तर कधी तोंडाला मुखवटे घालून हे दिल्लीत कोणाकोणाला भेटत होते? याचाच अर्थ यांचे राजकारण महाराष्ट्र संदर्भात किती पूर्वीपासून चालू होतं? हे हळूहळू उघड होत आहे. महाराष्ट्राला नाटकाची फार मोठी परंपरा आहे. अगदी बालगंधर्वपासून डॉक्टर श्रीराम लागू, नाना पाटेकर, प्रशांत दामले पर्यंत मोठे कलाकार हे या नाट्यसृष्टीला भेटले आहेत. त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. या तिघांना सुद्धा रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण ते इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगामामंच्यावर राजकारणात काम करत आहेत."