महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावा, धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका: संभाजी राजे छत्रपतींची मागणी - SANTOSH DESHMUKH MURDER

बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यानं शरणगती पत्करली आहे. या प्रकरणी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी मोक्का लावण्याची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh Murder
संभाजी राजे छत्रपती (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2024, 10:08 PM IST

Updated : Dec 31, 2024, 10:53 PM IST

पुणे : केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा पवनचक्कीच्या आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराड शरण आल्यावर स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील जे 7 आरोपी आहेत, त्या आरोपींचा म्होरक्या हा वाल्मिक कराड असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर मोक्का लावावा," अशी मागणी केली.

वाल्मिक कराड 7 आरोपींचा म्होरक्या :पुण्यातील स्वराज्य भवन येथील कार्यालयात संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संभाजी राजे म्हणाले, की "संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश मोर्चा झाला. यावेळी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. हा एवढा मोठा मोर्चा होता की त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. आज सकाळी वाल्मिक कराड हा सरेंडर झाला असून हे सीआयडीच यश आहे का, हा प्रश्न आहे. जेव्हा त्याचं अकाऊंट सिझ करण्यात आलं, तेव्हा मानसिक दबाव आल्यानं त्यानं सरेंडर केलं आहे. हा आरोपी 22 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, अक्कलकोटमध्ये जाऊन दर्शन घेत पुण्यात खासगी रुग्णालयात जातो, हे सीआयडीला कसं कळत नाही. काल जेव्हा धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज वाल्मिक कराड सरेंडर होतो, हे संशयास्पद आहे. हा कराड 7 आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत, पण कधीही कारवाई झाली नाही, असं यावेळी संभाजीराजे म्हणाले.

वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावा, धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका: संभाजी राजे छत्रपतींची मागणी (Reporter)

धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनात बोलताना आरोपींवर मोक्का लावणार असं म्हटले होते. म्हणून या म्होरक्यावर मोक्का लावावा अशी आमची मागणी आहे. फक्त खंडणीमध्ये गुन्हा दाखल न करता कराड याच्यावर मोक्का लावण्यात यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये, असं यावेळी राजे म्हणाले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे का शांत असून ते धनंजय मुंडेंवर का कारवाई करत नाहीत, असा सवाल देखील यावेळी संभाजीराजे यांनी केला.

हेही वाचा :

  1. बीड खंडणी प्रकरण : वाल्मिक कराड याला थोड्याच वेळात सीआयडी करणार केज न्यायालयात हजर
  2. संतोष देशमुख हत्याकांडात कोणाचीही गय केली जाणार नाही, सीआयडीला पूर्ण मोकळीक : देवेंद्र फडणवीस
  3. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
Last Updated : Dec 31, 2024, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details