मुंबई : भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघांपैकी एक आहे. क्रिकेटविश्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रिकेटपटू चांगली कामगिरी करत आहेत. पण या यशस्वी क्रिकेटपटूंना घडवण्यात प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. दरम्यान, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती स्मारकाचं मंगळवारी (3 डिसेंबर) शिवाजी पार्कमध्ये लोकार्पण करण्यात आलं. सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य प्रवीण आमरे, विनोद कांबळी, संजय बांगर, समीर दिघे तसंच आचरेकर सरांची कन्या विशाखा दळवी आदी उपस्थित होते. यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट चर्चेचा विषय होती.
राजकारणात थर्ड अंपायर नाही : स्मृती स्मारकाचं लोकार्पण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक निकालावरुन सत्ताधाऱयांना टोला लगावला. "खरंतर हे स्मारक आधीच झालं पाहिजे होतं. रमाकांत आचरेकर यांनी जेवढे क्रिकेटपटू घडवले तेवढे क्रिकेटपटू कोणीच घडवले नसतील. आचरेकर सरांनी क्रिकेटपटूसह चांगले प्रशिक्षक घडवले. या स्मारकात आचरेकर सरांच्या अनेक आठवणी आहेत. यात बॉल, बॅट, स्टम्प तसंच आचरेकर सरांची टोपी आहे. क्रिकेट जसं बदलत गेलं, तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अंपायरनं आऊट दिल्यावरही थर्ड अंपायर असतो. गेल्या निवडणुकीत आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता, तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळं आम्ही काही करू शकत नाही," अशी खंत व्यक्त करत राज ठाकरेंनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला टोला लगावला.