सातारा : साताऱ्यातील चाळकेवाडी पठारावर पालीच्या गेको प्रजातीचा शोध लावण्यात वन्यजीव शास्त्रज्ञांना यश आलंय. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पालीच्या नवीन प्रजातीच्या शोधामुळं महाराष्ट्राच्या पठारांवरील परिसंस्थेचं महत्त्व अधोरेखित झालंय. नवीन प्रजातीची पाल स्थानिक, दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींसोबत चाळकेवाडी पठारावर आढळते.
सस्तन प्राण्यांच्या अन्न खळीतील महत्वाचा घटक : गेको प्रजातीची ही पाल स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कीटक भक्षक म्हणून ती मच्छर, कोळी आणि अन्य किटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळं पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय ही पाल शिकारी पक्षी, साप, आणि लहान सस्तन प्राण्यांच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. तिच्या अस्तित्वामुळं स्थानिक जैवविविधतेचे अस्तित्व टिकून राहते. म्हणूनच हा शोध जैवविविधता संवर्धनासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं निरीक्षण वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद यांनी नोंदवलंय.
जैवविविधतेनं नटलेलं चाळकेवाडी पठार : साताऱ्यातील चाळकेवाडी पठारावर अपोनोगेटॉन सातारेंसिस, हेमिडॅक्टायलस सातारेंसिस, सरडा सुपर्बा या प्रजातींच्या पालींबरोबरच रॅबडॉप्स अक्वाटिकस आणि लाओपेल्टिस कॅलमारिया या सापांच्या जातीही आढळतात. राओरचेस्टेस घाटेई, या बेडकाच्या प्रजातीचा शोधही याच पठारावर लागला होता. चाळकेवाडी पठार हे बिबटे आणि अस्वलाचा भ्रमणमार्ग असून स्थलांतरित तसेच शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थानाची भूमिकाही बजावते.