मुंबई Ravindra Waikar ED Inquiry : पाचशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी ) साडेआठ तास चौकशी झाली. आमदार रवींद्र वायकर यांना ईडीनं समन्स बजावून सोमवारी बोलावलं होतं, त्यानुसार रवींद्र वायकर हे ईडी कार्यालयात दुपारी बारा वाजताच्या सुमारास हजर झाले होते. त्यानंतर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी "ईडीनं 19 वर्षापूर्वीची कागदपत्र मागितली होती, ती सादर केली. यानंतरही ईडीला सहकार्य करू," असं त्यांनी सांगितलं.
इकबाल सिंह चहलांनी परवागी का दिली हे सांगावं :ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रवींद्र वायकर यांनी सांगितलं की, "19 वर्ष जुनी कागपत्रं देणं कठीण होतं. त्यासाठी वेळ लागला. इतक्या वर्षानंतर बांधकाम अनधिकृत ठरवलं. 1 कोटी 62 लाखांचा फायदा केवळ 19 वर्षांत झाला, मात्र इकबाल सिंह चहलांनी परवागी का दिली हे सांगावं. 500 कोटी हा राजकीय दबावातून पुढं आलेला आकडा आहे. पुन्हा जर ईडीनं बोलावलं तर पुन्हा चौकशीला येईल," असं पुढं वायकर यांनी सांगितलं. वायकर यांचे वकील मोहन टेकवडे यांनी सांगितलं की, "ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रे आम्ही दिली. 19 वर्षांची कागपत्रं सादर केली, यापुढंही इडीला सहकार्य करू."
राजकीय दबावातून तक्रार :रवींद्र वायकर यांनी "आज ईडीनं जे प्रश्न विचारले, त्याची उत्तर दिली. आम्हाला 2002 पासून ते आतापर्यंत कागदपत्र मागितले होते. त्यामुळं आम्ही वेळ मागितली. आम्ही आज 19 वर्षाचे कागदपत्र दिली. 19 वर्ष बांधकाम चालेल, पण आताच का चालली नाही. राजकीय दबाव आल्यानंतर आयुक्ताच्या तक्रारीनंतर आमच्या विरोधात तक्रार झाली आहे. 19 वर्षात आम्हाला 1.22 लाखाचा फायदा झाला आहे. मला माहीत आहे, माझ्यावर कसा दबाव टाकण्यात आला आहे. अशा प्रकारे कोणी राजकरण करू नये. आयुक्तानी परवानगी दिल्यानंतर 2 वर्षांनी तक्रार करण्यात आली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आमची केस चालू आहे," असं पुढं रवींद्र वायकर यांनी सांगितलं.
500 कोटींच्या भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी :500 कोटींच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी आमदार रवींद्र वायकर यांना 17 जानेवारीला समन्स बजावून बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक महिन्यांची मुदत वाढ मागितली होती. मात्र त्यांना मुदतवाढ न देता ईडीनं पुन्हा समन्स बजावून 23 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, तेव्हाही वायकर चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यानंतर ईडीनं पुन्हा आज समन्स बजावून सोमवारी वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याचप्रमाणं ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्सच्या निवासस्थानी देखील छापेमारी केली होती. त्यावेळी ईडीनं 7 ठिकाणी छापे टाकले होते.
हेही वाचा :
- रवींद्र वायकर यांना ईडीनं धाडलं तिसऱ्यांदा समन्स; 'या' दिवशी होणार चौकशी
- ''कर नाही त्याला डर कशाला?'', रवींद्र वायकरांवरील धाडीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया