मुंबई - विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा ऐतिहासिक विषयावरील चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट याच नावाच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे आणि महान छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या रिलीजला फक्त दोन दिवस उरले असताना, छावानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आशादायक कमाई केली आहे.याला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटांपैकी एक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अॅडव्हान्स बुकिंग आणि ओपनिंग डेचा अंदाज - इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनं शेअर केलेल्या डेटानुसार, छावा चित्रपटानं आधीच प्रभावी अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. यामुळे व्हॅलेंटाईन डेला जोरदार ओपनिंगचे संकेत मिळत आहेत. मंगळवारपर्यंत, छावाची २,०५,७१७ तिकिटे विकली गेली होती, ज्यांची कमाई ५.७७ कोटी रुपये होती. ब्लॉक सीट्सची एकूण संख्या ७.३ कोटी रुपये होती, आणि ओपनिंग १८ ते २० कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे. विकी आणि रश्मिका स्टारर या चित्रपटाची भारतातील सुमारे ६,५४० थिएटरमध्ये ७,४८३ शोसाठी तिकिटे विकली गेली आहेत.
सर्टिफिकेट आणि रनटाइम - अनेक बदलांनंतर, चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून UA १६+ प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. चित्रपटाचा रनटाइम २ तास ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे.
छावाचं शूटिंग आणि विकी कौशलची तयारी - या पीरियड ड्रामाचं शूटिंग ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झालं होतं आणि मे २०२४ मध्ये पूर्ण झालं. लक्ष्मण उतेकर यांचा विकी कौशलबरोबरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी २०२३ मध्ये 'जरा हटके जरा बच के' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. दोघांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान 'छावा' बद्दलची चर्चा केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी, विकी कौशलनं सुमारे सहा ते सात महिने घोडेस्वारी, तलवारबाजी, काठीबाजी, भालाबाजी शिकण्याचे कठोर प्रशिक्षण घेतलं होतं. या भूमिकेसाठी त्याने २५ किलो वजनही वाढवलं होतं.
बजेट आणि मानधन - माध्यमातून आलेल्या माहितीनुसार, 'छावा' चित्रपटाचं बजेट १३० ते १५० कोटी रुपये आहे. मुख्य भूमिका साकारणाऱ्या कौशलला चित्रपटासाठी सुमारे १० कोटी रुपये देण्यात आल्याचं, तर रश्मिकाला या भूमिकेसाठी ४ कोटी रुपये मिळाल्याचं सांगतलं जातं.
चित्रपटाभोवती वाद - 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून, चित्रपटाची केवळ प्रशंसाच झाली नाही तर टीकाही झाली. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकीला त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या रश्मिका मंदानाला लेझीम नृत्य करताना दाखवल्यानं त्या दृष्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. मात्र वाद न वाढवता निर्मात्यांनी हे दृष्य काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानं पडदा पडला होता.
बॉक्स ऑफिसवर संघर्ष - 'छावा' हा चित्रपट आधी ६ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. आता या चित्रपटाची टक्कर हॉलिवूडमधील 'कॅप्टन अमेरिका: ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'शी होणार आहे. तसेच, सध्या 'सनम तेरी कसम' सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही चित्रपटांव्यतिरिक्त, अजित कुमारचा 'विदाईमुर्ची' देखील थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. हे सर्व चित्रपट 'छावा'साठी स्पर्धक असणार आहेत.