अमरावती : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आज गोरगरीब आदिवासींची गावं दिसत असली तरी फार पूर्वी या भागाचा थेट संबंध दिल्लीशी होता. दिल्लीत कोणाचीही सत्ता असो मेळघाटातून सारा वसुली करून तो दिल्लीत पोहोचवण्याची जबाबदारी ही राजस्थानमधून मेळघाटात स्थिरावलेल्या पवार कुटुंबाकडं होती. मेळघाटातील अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या कोट जहांगीर या गावात एका टेकडीवर पवार घराण्याचा पडक्या अवस्थेतील किल्ला आज देखील मेळघाटात एकेकाळी समृद्ध असा काळ होता याची साक्ष देतो. कोट जहांगीर येथील किल्ल्यासोबतच पवार कुटुंबाचा इतिहास आणि आजच्या परिस्थिती संदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
असा आहे तटबंदीचा परिसर कोट : जहांगीर गावाजवळ असणाऱ्या उंच टेकडीवर चारही बाजूनं दगडांची मोठी तटबंदी आहे. या तटबंदीत शिरण्याकरिता पूर्वी एक छोटसं दार होतं. जे आजही झुडुपात वेढलेलं दिसतं. या तटबंदीच्या आतमध्ये किल्ला होता. आज मात्र या ठिकाणी दगडाची तटबंदी अनेक ठिकाणी उध्वस्त झाली आहे. तटबंदीच्या आतमध्ये दोन इमारती आज दिसतात. भग्नावस्थेत असणाऱ्या दोन मजली इमारतीमध्ये अनेक लहान-मोठ्या खोल्या असल्याचं आढळतं. या पडक्या इमारतीत वरच्या बाजूला जाण्याकरिता आणि खाली तळमजल्यात उतरण्याकरिता पायऱ्या होत्या. या पायऱ्या आज देखील या ठिकाणी दिसतात. या इमारतीच्या मध्यभागी एक मोठी खोली आहे. हे सभागृह असाच असा अंदाज गड किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना सांगितलं. दगड आणि विटांच्या सहाय्यानं या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं. या इमारतीमध्ये असणाऱ्या दारांच्यावर ज्या कमानी आहे, त्यावर रेखीव बांधकाम केलं आहे. आज या ठिकाणी आढळणारी इमारती पूर्वी मोठी हवेली होती असं या इमारतीच्या रचनेवरून स्पष्ट होतं. या ठिकाणी असणाऱ्या पवार घराण्यातील फत्तेसिंह पवार यांनी हा किल्ला बांधला. असं देखील शिवा काळे यांनी सांगितलं.
तटबंदीच्या आतमध्येच सर्व व्यवहार : ओबडधोबड दगडांच्या तटबंदीच्या आतमध्ये अनेक दगडं पडली आहेत. या ठिकाणी पूर्वी आणखी छोट्या-मोठ्या इमारती असाव्यात ज्या कालांतरानं पडल्या. या परिसरातील सर्व व्यवहार हे तटबंदीच्या आतमध्ये चालायचे असं हा परिसर पाहिल्यावर लक्षात येतं. ज्या ठिकाणी पडलेली हवेली आहे तिच्या दक्षिण बाजूला दक्षिणमुखी दरवाजा आहे. दगडांचा हा दरवाजा देखील आज या ठिकाणी भग्नावस्थेत दिसतो.
असा आहे इतिहास : अकबराच्या काळापासून मेळघाटात एकूण सात कुटुंबांजवळ जहागिरी होती. उत्तर भारतात राज्य कोणाचंही असलं तरी मेळघाटात जहागिरी मात्र सात कुटुंबांकडेच होती. यापैकी पवार कुटुंबजवळ एकूण 999 गावांमधून शेतसारा वसूल करण्याचं काम होतं. बहिरम जवळ असणाऱ्या खरपी गावापासून धारणीच्या पलीकडं असणाऱ्या धुळघाट पर्यंतच्या गावांची जहागीर पवार कुटुंबाजवळ होती. कोट जहांगीर प्रमाणेच पवार कुटुंबानं कोट जहागीर येथून पन्नास किलोमीटर अंतरावर सेमाडोह या गावापासून उंच पहाडावर वसलेल्या माखला या गावात किल्ला बांधला होता. 1857 च्या उठावा दरम्यान तात्या टोपे हे माखला गावात पवारांच्या किल्ल्यात होते. त्यावेळी पवार घराण्यातील खुमान सिंह राजाच राज्य होतं. इंग्रज सैन्य तात्या टोपे यांच्या शोधात माखला गावात पोचण्यापूर्वी तात्या टोपे हे तिथून निसटले होते. असं असलं तरी, इंग्रज सैन्यानं माखला येथे असणाऱ्या खुमानसिंह राजाच्या आदिवासी सैन्याला ठार मारला आणि त्यांचे मृतदेह खोल दरीत फेकून दिलेत. या घटनेच्यावेळी खुमान सिंह राजा हा कोट जहांगीर येथील किल्ल्यात होता. इंग्रजांनी यानंतर खुमानसिंह राजावर अनेक निर्बंध लादली अशी माहिती देखील शिवा काळे यांनी दिली.
पवार कुटुंबातील वंशज सांगतात आठवणी : कोट जहांगीर या ठिकाणी पवार कुटुंबातील अखेरचा राजा म्हणून राजा मनमोहन सिंग कारभार पाहत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर देशातील सर्वच राजघराणे आणि जहागीरदारांची जहागिरी ही खालसा करण्यात आली आणि स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आलीत. पवार कुटुंबाची मेळघाटातील जहागिरी संपली असं असलं तरी या किल्ल्यामध्ये पवार कुटुंबाचे वंशज हे 1960 पर्यंत राहत होते. टेकडीवर असणाऱ्या किल्ल्यात माझा जन्म झाला असल्याची माहिती पवार कुटुंबातील वंशज गेनसिंग रामसिंग पवार यांनी दिली. वयाच्या दहा वर्षापर्यंत मी, माझे आई-वडील आणि मोठ्या काकांचं कुटुंब या किल्ल्यातच राहायचं असं गेनसिंह पवार सांगतात.
पवार कुटुंबांनं सोडला किल्ला : दोन मजली असणाऱ्या या किल्ल्याच्या पहिल्या मजल्याचा छत हे लाकडाचं होतं. वरच्या मजल्याचं छत हे माती आणि गवतानी तयार केलेलं होतं. पावसामुळं वरचं छत हे कुठल्याही क्षणी कोसळणार असं लक्षात येताच माझ्या वडिलांनी किल्ला सोडून टेकडीच्या खाली गावात आम्हाला घर बांधून दिलं. मोठे काका मदन मोहनसिंह आणि भारतसिंह हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या सासरी धारणीच्या पलीकडं असणाऱ्या सुसर्दा गावात राहायला गेलेत. आज आम्ही या गावात शेती करतो. आमचे पूर्वज मेळघात राज्य करायचे. खुमान सिंह हा अतिशय शौर्यवान राजा आमच्या कुटुंबात होऊन गेला. आमच्या कुटुंबाची ओळख असणाऱ्या किल्ल्याचे भग्नावशेष आज देखील टेकडीवर आहेत असं देखील गेनसिंह पवार म्हणाले.
हेही वाचा -