हैदराबाद : भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकल्या आहेत. नासानं आता त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी तयारी सुरू केलीय. यासाठी नासा एलोन मस्कची अंतराळ कंपनी स्पेसएक्सची मदत घेत आहे. नासानं याला क्रू रोटेशन मिशन असं नाव दिलं आहे. नासा आता क्रू 10 लाँच मिशन लॉंच करणार आहे. त्यामुळं अंतराळवीरांना पृथ्वीवर लवकर परत आणता येणार आहे. नासा आणि स्पेसएक्सनं क्रू10 वर पाठवण्यासाठी जुन्या अंतराळयानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, तर यापूर्वी या मोहिमेसाठी नवीन अंतराळयान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नासाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी क्रू 10 मिशन 12 मार्च 2025 रोजी प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. तथापि, ही तारीख बदलू शकते. या मोहिमेची तयारी आणि उड्डाण तयारी प्रक्रियेच्या पूर्णतेवर अवलंबून असेल. क्रू 10 सह काही दिवसचा कालावधी पूर्ण केल्यानंतर क्रू 9 मिशन पृथ्वीवर परत आणलं जाईल. हस्तांतरण कालावधीमुळं क्रू 10 टीमला आयएसएस (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) वर पोहोचल्यानंतर आधीच अस्तित्वात असलेल्या क्रूकडून कामाचं ज्ञान मिळू शकेल.
सुनीता विल्यम्स यांना परत आणण्याच्या नासा आणि स्पेसएक्सच्या जुन्या योजनेनुसार, क्रू 10 साठी एक नवीन ड्रॅगन अंतराळयान प्रक्षेपित केलं जाणार होतं, परंतु आता स्पेसएक्सनं या मोहिमेसाठी एक जुनं ड्रॅगन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचं नाव "एन्ड्युरन्स" आहे. नवीन ड्रॅगन अंतराळयान प्रक्षेपणासाठी तयार करण्यासाठी अधिक वेळ लागेल, म्हणून जुनं अंतराळयान प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेतील या बदलामुळं सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना लवकरच पृथ्वीवर परत आणता येईल, असं मानलं जात आहे.
अंतराळयानाची चाचणी
एन्ड्युरन्स अंतराळयानाच्या मागील उड्डाणांदरम्यान केलेली दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून मोहिमेची सुरक्षितता आणि सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण करता येतील. त्यानंतर पुन्हा अंतराळयान तयार केलं जाईल. या तयारींमध्ये ट्रंक स्टॅक करणे, प्रोपेलेंट लोड करणे आणि ते स्पेसएक्सच्या हँगरमध्ये (फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटर येथे स्थित) नेत ते फाल्कन ९ रॉकेटला जोडणे समाविष्ट असेल. हे अंतराळयान आतापर्यंत एकूण 3 वेळा आयएसएसवर पोहोचलं आहे. क्रू3, क्रू5 आणि क्रू7 होती अशी आगोदरच्या प्रेक्षपणाची नावं होती. आता हे अंतराळयान क्रू 10 सह चौथ्यांदा उड्डाण करण्याची तयारी करत आहे.
- क्रू 10 मोहिमेसाठी अंतराळवीर
- कमांडर : नासाच्या अॅन मॅक्क्लेन
- पायलट : निकोल आयर्स, नासा
मिशन स्पेशालिस्ट : जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) चे ताकुया ओनिशी आणि रशियाच्या स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे किरिल पेस्कोव्ह.
क्रू 10 च्या आगमनानंतर क्रू 9 अंतराळवीर निक हेघ, सुनीता विल्यम्स, नासाचे बुच विल्मोर आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना पृथ्वीवर परत आणलं जाईल. तथापि, नासा किंवा स्पेसएक्सनं अद्याप अंतराळवीर पृथ्वीवर कधी परत येऊ शकतील याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु जर क्रू 10 मोहीम 12 मार्च रोजी सुरू झाली तर मार्चच्या अखेरीस, सुनीता विल्यम्ससह आयएसएसमध्ये अडकलेले सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील.
हे वाचलंत का :