मुंबईSamir Wankhede Case:कार्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणामध्ये आर्यन खान याला सोडविण्यासाठी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने आणि नंतर ईडीने देखील ठेवलेला आहे. त्याच प्रकरणांमध्ये राष्ट्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी समीर वानखेडे यांच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्याच्या आधारावर दिल्ली उच्च न्यायालयात समीर वानखेडे यांनी धाव घेतली होती. त्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं समीर वानखेडे यांना दिलासा दिलाय आणि ज्ञानेश्वर सिंग यांच्या चौकशीलाच प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. कारण त्यांच्या चौकशी पथकानं समोर आणलेले पुरावे हे समीर वानखेडे यांच्या विरोधात वापरता येणार नाही, असं न्यायालयानं नमूद केलेलं आहे. न्यायाधीश रेखा पल्लई आणि न्यायाधीश शैलेंद्र कौर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. 12 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं याबाबत निर्णय दिलेला आहे.
कोणत्या कारणामुळे समीर वानखेडे यांची चौकशी? :मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डेलिया क्रूज संदर्भात तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी छापा घातला होता. त्यात ड्रग्स बाळगल्याच्या आरोपात अनेक व्यक्तींना अटक केली होती. त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये आर्यन खान याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. समीर वानखेडे यांच्या संदर्भातील प्रकरणाची चौकशी एनसीबीचे संचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी पथक करत होतं.