नागपूर Nagpur Murder Case:नागपूर पोलिसांनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा कट कसा उघड केला. या संदर्भात नवीन माहिती पुढे आलेली आहे. त्या आधारे नागपूर पोलिसांनी हिट अँड रन सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे.
तपास केला होता बंद :पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघातात झाला हे सत्य मानून पोलिसांनी ही अपघाती मृत्यूची नोंद करत तपास बंद केला होता. मात्र, तरी हे सत्य सर्वांसमोर आलं. आरोपींनी फुल-प्रूफ योजना आखून पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा काटा काढला होता. आरोपी आपल्या कामात यशस्वी देखील झाले होते. त्यानंतर १५ दिवस लोटल्यानंतर असं काय घडलं की, ज्यामुळे सर्व आरोपी पोलिसांच्या कस्टडीत पोहोचले आहेत.
आणि पोलीस कामाला लागले : आतापर्यंत तपासात समोर आलेल्या माहितीनुसार एक भुरटा गुन्हेगार नीरज निमजे गेल्या काही दिवसांपासून अचानक महागड्या पार्ट्या देऊ लागला होता. मित्रांवर अमाप खर्च करू लागला. कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधीचं मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला. दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला होता. त्यामुळे काहीना त्यांच्यावर शंका आली. खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आला असून तो दारूच्या पार्ट्या करत आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले.
आरोपीला दारू पार्ट्या नडल्या आणि बिंग फुटले : पोलिसांनी निरजच्या संदर्भातील माहिती गोळा करायला सुरुवात केली. नीरजच्या अवतीभवती खबरे पेरले. एका अपघाताच्या प्रकरणानंतरच नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना समजली. नागपूर शहरामध्ये कुठे अपघाताचे प्रकरण घडले आहे का, ज्यामध्ये अद्यापही आरोपी चालक सापडलेले नाही, याची माहिती घेणं सुरू केली असता बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार अपघात प्रकरण समोर आलं. गुन्हे शाखा पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेतले. सुरुवातीला नीरज हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर आणखी संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवयाचं आरोपी नीरजने पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच पोलिसांना दिली.
काय आहे प्रकरण? : सासऱ्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती केवळ आपल्यालाचं मिळावी या हेतूने नागपुरात एका सुनेने सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पुरुषोत्तम पुट्टेवार असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची मास्टरमाइंड ही अर्चना मंगेश पुट्टेवार आहेत. त्या गडचिरोलीत टाऊन प्लॅनिंग विभागात उच्चपदस्थ अधिकारी आहे. अर्चनाने तिचा भाऊ प्रशांतच्या मदतीने सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भर रस्त्यामध्ये भरधाव कारने चिरडून हत्या केली होती. या घटनेनंतर तब्बल १८ दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांच्यासह तिचा भाऊ प्रशांत पारलेवार आणि प्रत्यक्षात हत्याकांड घडणाऱ्या तीनही भाडोत्री सुपारी किलरला देखील अटक करण्यात आली आहे.
उच्चपदस्थ बहीण भावाने रचला हत्येचा कट : ८८ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणात पोलिसांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे (एमएसएमई) संचालक प्रशांत पारलेवार यांनाही अटक केली आहे. प्रशांत पार्लेवार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गडचिरोली नगर विकास सहाय्यक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार याचे भाऊ आहे. याप्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या रडावर असून त्यांनाही लवकर अटक होण्याची शक्यता आहे.