पुणेDr Bhagwan Pawar Allegation: पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ. भगवान पवार यांचे दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. डॉ. पवार यांच्या विरुध्द आर्थिक अनियमितता, महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ, अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देणे इत्यादी बाबत शासनास विविध गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता या प्रकरणी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले आहेत.
नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून निलंबन :डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, माझे कामकाज आणि सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आणि हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे तसेच इतर कामांमध्ये मदत करण्यास दबाव आणला होता; परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही तसेच इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती. यानंतर आरोग्य अधिकारी (प्रमुख), महानगरपालिका पुणे हे पद रिक्त करण्याकामी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती स्थापन करून चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करून मला निलंबित करण्यात आलेलं आहे.