पुणे Pune Car Accident Case Updates :पुणे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या आजोबांवर पुणे गुन्हे शाखेनं पोर्श कार चालकाला धमकावल्याचा आरोप करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध आयपीसी 365 आणि 368 अंतर्गत स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.
पोर्शे कारनं दोन जणांना जीवे मारणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी कार चालक गंगाधर पुजारीला डांबून ठेवलं होतं. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आजोबांना अटक केली आहे. तसंच त्यांच्यावर स्वतंत्रपणे एफआयआर दाखल करण्यात आलाय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (24 मे) पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, सदरील कार ही अल्पवयीन मुलानं नव्हे तर चालकानं चालविली होती, असं दाखविण्याचा प्रयत्न केला जात होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आणि आजोबांनी ड्रायव्हरचा फोन ताब्यात घेतला. त्याला 19 मे ते 20 मे दरम्यान बंगल्याच्या आवारात असलेल्या घरात डांबून ठेवलं. ड्रायव्हरच्या पत्नीनं पतीची सुटका केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याचंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? :अपघात झाला तेव्हा पोर्शे कारमध्ये एकूण 4 जण होते. त्यात गाडीचा चालक देखील होता. अपघातानंतर अगरवाल कुटुंबियांनी कार चालक गंगाधर याला तूच गाडी चालवत होता असं सांगण्यास प्रवृत्त केलं. तसंच त्याला गिफ्ट देतो म्हणून ते घरी घेऊन गेले. यावेळी कार चालकाचा फोन काढून घेत त्याला घरात डांबून ठेवण्यात आलं. तसंच त्याला गुन्हा कबुल करण्यासाठी धमकावण्यात आलं.
सहा जणांना अटक :पुण्यातील न्यायालयानं कल्याणनगर अपघातात सहा जणांना न्यायालयीन कोठवडी सुनावली असून यामध्ये अल्पवयीन मुलाच्या पित्याचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलाची बालहक्क न्याय मंडळानं जामिनावर सुटका केली होती. टीकेची धनी झालेल्या पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द झाला. तरअल्पवयीन मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा -
- पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले.... - Deputy CM Ajit Pawar
- पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन; वरिष्ठांना वेळेत माहिती न दिल्याचा ठपका - Pune Hit and Run
- ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न, पण गाडी अल्पवयीन मुलानेच चालवली - पुणे पोलीस आयुक्त - Pune Hit And Run Case Update