अमरावती Bus Fell In River At Semadoh : खासगी प्रवासी बस पुलावरुन नदीत कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मेळघाटातील सोमाडोह परिसरात धारणीजवळ घडली. या अपघातात तब्बल 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बसमधून शिक्षक आणि शाळेवरील कर्मचारी प्रवास करत असल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली आहे. या बसमधील अनेक प्रवाशांना मोठी दुखापत झाल्यानं घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
मृत आणि जखमींमध्ये शासकीय कर्मचारी अधिक :शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे धारणी, हरीसाल, सेमाडोह या ठिकाणी शासकीय सेवेत असणारे अनेक कर्मचारी शुक्रवारी अमरावतीला आले. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्यानं सोमवारी सकाळी अमरावतीतूनच ही खासगी बस सुमारे 55 ते 60 प्रवाशांना घेऊन धारणीकडं निघाली. सीमाडोह जवळ खासगी बस नदीत कोसळताच अनेक प्रवासी एकमेकांच्या अंगावर दबले. सेमाडोह येथील रहिवाशांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्याचा शर्थीनं प्रयत्न केला. घटनास्थळीत चार जण दगावले होते तर दोघं उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेनं निघाले असतानाच रस्त्यात दगावले. या घटनेमुळे अमरावती शहरात देखील खळबळ उडाली असून या बसमध्ये असणाऱ्या मृत आणि जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी परतवाड्याच्या दिशेनं धाव घेतली. या अपघातात पन्नास जण गंभीर जखमी झालेत.