छत्रपती संभाजीनगर : गरोदर असलेल्या सिल्लोडमधील विवाहितेच्या आत्महत्येचं धक्कादायक गूढ उकललं आहे. सासरच्या मंडळींनी हत्या केल्यावर तिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, मुलीच्या पोटावर बसून तिला मारहाण केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी सिल्लोड पोलीस स्टेशनात केली होती. शवविच्छेदन अहवालातून या महिलेची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. मनीषा सतीश सपकाळ असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी पतीसह सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. तर या घटनेनं पैशांसाठी माणसातील संवेदना हरवत चालली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हत्या करून आत्महत्येचा बनाव : सिल्लोड शहरातील शास्त्री कॉलनीत राहणाऱ्या मनीषा सपकाळ या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सासऱ्यानं तिच्या वडिलांना फोन करून दिली. वडिलांनी तातडीनं मुलीचं घर गाठलं. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. त्यावेळी मुलीचे वडील बंडू शेळके यांनी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारल्याची तक्रार दिली. मात्र समोर असलेल्या परिस्थिती नुसार आत्महत्या केल्याचं दिसून येत होतं. परंतु, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर महिलेचा मृत्यू हा मारहाणीमुळं झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून सिल्लोड पोलिसांनी मृत महिलेचा पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ, सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली.