छत्रपती संभाजीनगर Doctor Girl Suicide Case : महिला डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टर पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पतीच्या छळाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यात डॉ प्रतीक्षा गवारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी अखेर त्यांचा पती प्रीतम गवारेला सिडको पोलिसांनी आता ताब्यात घेतलय. तो रशियात एमबीबीएस शिकलेला असल्यानं त्याच्याकडं विजा होता. रशियाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शहरालगत असलेल्या पडेगावमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 24 ऑगस्ट रोजी डॉक्टर प्रतीक्षा गवारे यांनी आठ पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.
पतीच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या :छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीनं गळफास घेतलाय. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या विवाहितेचं नाव आहे. पती हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता, शिवाय माहेरुन हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या या डॉक्टर पत्नीनं आपलं आयुष्य संपवलं. महत्त्वाचं म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करुन घरी बोलावलं मात्र तो येण्यापूर्वीच तिनं गळफास घेतलेला होता. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.