पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव! गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा होरपळून मृत्यू पिंपरी Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात आज (23 जानेवारी) पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास पत्राच्या शेडला आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा मृत्यू : अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडीतील जय मल्हार कॉलनीमध्ये पत्राशेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. दोन्ही गोडाऊन मधील पहिल्या गोडाऊनमध्ये असलेल्या लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे कारने (स्विफ्ट- एमएच 14/डीएक्स 9701) पेट घेतला होता. तसंच दुसऱ्या गोडाऊन मध्ये अल्युमिनियमच्या फ्रेम आणि दोन टू व्हीलर जळून खाक झाल्या आहेत. यावेळी या गोडाऊनमध्ये झोपलेल्या ललित अर्जुन चौधरी (वय- 21) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय-23) या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश :या घटनेची माहिती मिळताच 5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी जवळपास 35 ते 40 अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली. तसंच या परिसरातील अन्य निवासी इमारतीमधील सर्व नागरिकांना पोलिसांच्या मदतीनं इमारतीबाहेर सुरक्षित स्थलांतरित करण्यात आलं.
गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीजमधील वखारीला लागली आग : या घटनेसंदर्भात स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीजमधील वखारीला अचानक आग लागली. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून आहे. त्यामुळे ही आग ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेडपर्यंत पोहोचली. या शेडला एकच दरवाजा असल्यामुळं आतमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डाय-ऑक्साइडचा धूर झाला. तसंच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर झाेपलेले दोघजणं धुरामुळे बेशुद्ध पडले. त्या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
हेही वाचा -
- शेकोटीमुळे घराला लागलेल्या आगीत दोघ लहान मुलांचा होरपळून ...
- थंडीत घरात पेटविली शेकोटी, आगीत दोन मुलांचा होरपळून मृत्यू
- नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक परिसरात केमिकल्स फॅक्टरीला ...