मुंबई Dharavi Dispute : धार्मिक स्थळावरील अनधिकृत भाग तोडण्यावरुन मुंबईतील धारावी परिसरात तणाव निर्माण झाला आहे. धारावीतील एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावरून मुंबई महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिक आमने-सामने आले. अनधिकृत भाग तोडण्यास विरोध दर्शवत महापालिकेच्या पथकाच्या वाहनांवर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे. महापालिकेकडून तोडकामास आठ दिवसाची स्थगिती देण्यात आल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
महापालिकेच्या वाहनांची तोडफोड :धारावीतील एका धार्मिक स्थळाचा काही अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक धार्मिक स्थळावर दाखल झालं. मात्र एका समुदायानं या पथकाला विरोध दर्शवत परिसरातील रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे धारावी परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मुंबई पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड या देखील परिसरात दाखल झाल्या. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं - संजय राऊत :धारावीतील एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत बांधकामाचा काही भाग मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आला. त्यामुळे धारावी परिसरात तणाव आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "तेथील परिस्थितीवर राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. धारावीतील प्रमुख सर्वपक्षीय लोक आयुक्तांना भेटले आहेत. शांततेच्या मार्गानं मार्ग काढावा लागेल."