मुंबईState Election Commission :राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक गेल्या दीड वर्षांपासून रखडली आहे. ही निवडणूक केव्हाही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्याचा सपाटा चालवला आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे सुमारे 396 पक्षांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त युपीएस मदान यांनी दिली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं काही महानगरपालिकांमधील प्रभाग रचना बदलली. लोकसंख्येच्या प्रमाणात नव्यानं प्रभागरचना केल्यानं काही प्रभागांची संख्या वाढली. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा एकदा प्रभाग रचना पूर्ववत केली. तसेच सरकारने कायद्यात सुधारणा करून याबाबतचे अधिकार स्वतःकडे घेतले.
दीड वर्षांत वाढली पक्षांची नोंदणी:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी वेगवेगळे स्थानिक पक्ष उदयाला येत असतात. स्थानिक आघाड्या आणि संघटना या निवडणूक आयोगाकडे आपल्या पक्षाची नोंदणी करत असतात. त्यानुसार राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात, असा अंदाज या स्थानिक आघाड्यांना आणि पक्ष संघटनांना आला आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रतिक्षेत:राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण वगळून नगरपालिकांच्या निवडणुका यापूर्वी जाहीर केल्या होत्या. तसेच ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारच्या बांठिया आयोगाच्या अहवालालाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या संदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यानं राज्यातील 27 महानगरपालिका तसेच 385 पैकी 257 नगरपालिका आणि नगरपंचायती 34 पैकी 26 जिल्हा परिषदा आणि ३५१ पैकी 289 पंचायत समित्या निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे सध्या तरी या निवडणुकांवर प्रशासकराज आहे.
किती पक्षांची झाली नोंदणी?राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये विविध पक्षांनी आपली नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 2022 अखेरीस एकूण 351 पक्षांची नोंदणी आयोगाकडे होती. 2023 अखेरीस ही संख्या 376 वर पोहोचली. lj आता ही संख्या 396 इतकी झाली आहे. दरवर्षी सुमारे 25 नव्या पक्षांचा उदय झाल्याचं यावरून दिसून येते. गेल्या तीन वर्षांत सुमारे 75 नव्या छोट्या पक्षांनी आपली नोंदणी केली आहे. सध्या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या पक्षांमध्ये पाच राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. तर चार राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे. अन्य राज्यातील 10 पक्षांची नोंदणी आयोगाकडे झाली आहे. तर राज्यातील छोट्या पक्ष संघटना आणि आघाड्या मिळून 377 पक्षांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त युपीएस मदान यांनी दिली.
हेही वाचा:
- निवडणूक आयोग पाच वर्षे झोपा काढतं का? राज ठाकरेंनी सुनावलं, मराठा आरक्षणावरही दिली प्रतिक्रिया
- "निवडणूक आयोग भाजपाचा बटिक, येणाऱ्या निवडणुकीत अजित पवारांना कोल्हापुरी हिसका दाखवू"
- सर्व्हेक्षणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची यादी जाहीर, नवीन मतदारांमध्ये झाली वाढ