मुंबई Minor Girl Sexual Assault Case :पश्चिम बंगालमधील कोलकोता इथं डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. त्यातच मुंबई जवळ असलेल्या बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतप्त पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली. आज सकाळी बदलापूर परिसरात जनता रस्त्यावर उतरल्यानं आंदोलन चिघळलं. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू असून, आंदोलकांकडून नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणी आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाही - विजय वडेट्टीवार :विशिष्ट संस्था असल्यानं या प्रकरणाती आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या प्रकरणी "पालकांना बसवून ठेवलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करावं अशी मागणी देखील त्यांनी केली. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तास पोलीस स्थानकात बसवून ठेवलं. त्यामुळे कारवाई करण्यात यावी त्यासह हे प्रकरण तीन महिन्यात फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी," अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कायदा आहे कुठे, काय करताय गृहमंत्री, असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही. सरकार झोपलं का, याकडं सरकारनं लक्ष दिलं नाही तर, महाराष्ट्रातील मुली, महिला सुरक्षित राहणार नाहीत, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
महिलांवरील अत्याचाराकडं दुर्लक्ष - बाळासाहेब थोरात :सत्तेच्या लालसापोटी लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजुला स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करायची नाही, हे सरकारचे धोरण आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवरील अत्याचार त्यानंतर बालकांवर अत्याचार सुरू झाला आहे. हे भयानक स्वरूप पाहायला मिळत आहे, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.