महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - OPPOSITION BOYCOTTS

महायुतीचं सरकार हे खुनी, शेतकरी विरोधी, दिवसाढवळ्या खून करणारे असल्याकारणाने या सरकारच्या चहापानाला जाण्यात काही अर्थ नाही, असं सांगत महाविकास आघाडीने सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातलाय.

Opposition boycotts government tea party
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

मुंबई -उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी नागपूर येथे होत असून, आज देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापानाचं आमंत्रण दिलंय. परंतु महायुतीचं सरकार हे खुनी, शेतकरी विरोधी, दिवसाढवळ्या खून करणारे आणि दलितांवर अत्याचार करणारे सरकार असल्याकारणाने या सरकारच्या चहापानाला जाण्यात काही अर्थ नाही, असं सांगत महाविकास आघाडीने सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातलाय. महाविकास आघाडीच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय घेण्यात आलाय.

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी : याप्रसंगी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूरमध्ये हे अधिवेशन होत असून विदर्भाचा मुख्यमंत्री असल्याकारणाने हे अधिवेशन तीन आठवड्याचे होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु हे अधिवेशन अल्पकाळासाठी होत आहे. या कारणाने संपूर्ण विदर्भवासीयांची निराशा झालीय. राज्याची स्थिती ही दिवसेंदिवस खालावत चाललीय. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनता ही संकटात असताना हे सरकार मात्र स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये व्यस्त आहे. या कारणाने या सरकारच्या चहापानाला जाण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. यासोबतच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचंही ते म्हणालेत.

ईव्हीएमच्या आधारावर आलेलं सरकार :याप्रसंगी बोलताना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून जवळपास 7 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यातील सर्वात जास्त आत्महत्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात झाल्यात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघालेत. राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले असून, आतासुद्धा ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार स्थापन झालंय. मारकडवाडी सारख्या अनेक गावांनी ईव्हीएमला विरोध केल्याने गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम या सरकारने केलंय. सोयाबीन, कापूस, धान्याला योग्य भाव न देणारं हे सरकार असून, दुधाचे भावसुद्धा दिवसेंदिवस घसरत चाललेत. शेतकऱ्यांना जाहीर झालेलं अनुदानही या सरकारने अद्याप दिलेलं नाही. या कारणाने अशा सरकारसोबत चहापान करण्यात विरोधी पक्षाला कुठलाही रस नसल्याकारणाने आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं दानवे म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details