मुंबई Lalbagh Raja Ganesh : मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला असून पहिल्या दोन दिवसात लाखो भाविकांनी गणरायांचं दर्शन घेतलं आहे. 'लालबागच्या राजा'च्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दान रुपातील पैशाची मोजणी 8 सप्टेंबरपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी राजा चरणी भाविकांनी 48 लाख 30 हजार रुपये अर्पण केले तर दुसऱ्या दिवशी राजाच्या स्टेजवरील दानपेटीत ४१ लाख ३० हजार तर रांगेतील दानपेटीत २५ लाख ८० हजार जमा झाले. तसंच तिसऱ्या दिवशी ५७ लाख ७० हजार जमा झाले आहेत. चौथ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीत ५८ लाख ५० हजार जमा झाल्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितलं.
मयूर महलात विराजमान : गेल्या चार दिवसात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी २ कोटी ३१ लाख ६० हजार रुपये इतकं दान अर्पण केलं आहे. 'लालबागचा राजा' यंदा मयूर महलात विराजमान झाला असून आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. इतक्या तुडुंब गर्दीत देखील व्हीआयपींबरोबर महिला, पुरुष, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक दूरवरून येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ठिकठिकाणी दानपेट्या ठेवलेल्या आहेत.
८ सप्टेंबर पासून मोजणी :या दान पेट्यांमध्ये भाविक स्वेच्छेनं दान अर्पण करतात. कोणी सोन्या-चांदीच्या वस्तू तर कोणी पैशाच्या स्वरुपात दान या दानपेटीत अर्पण करतात. या जमा झालेल्या दानाची ८ सप्टेंबर पासून मोजणी सुरू झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी या दान मतमोजणीत सहभागी झालेत. ८ सप्टेंबर पासून सुरू झालेलं हे मोजणीचं काम अनंत चतुर्दशीच्या आदल्यादिवशी पर्यंत म्हणजे १६ सप्टेंबरपर्यंत सुरू असतं.
१०७ तोळे सोनं :यंदा पहिल्याच दिवशी शनिवार असल्यामुळं मोठ्या संख्येनं भाविकं राजाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी जमा झालेल्या दानाची मोजणी करण्यात आली. एकूण ६७ लाख १० हजार रुपये लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केल्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितलं. तसंच बाप्पांच्या चरणी चौथ्या दिवशी १०७ तोळे सोनं आणि ४७०८ ग्राम चांदी अर्पण करण्यात आल्याचंही दळवी म्हणाले.
हेही वाचा..
- गाव करेल ते राव काय करेल, कोल्हापुरातल्या 'या' गावानं जपलीय गणेशोत्सवाची अनोखी परंपरा - Ganeshotsav 2024
- काय म्हणता पाकिस्तानात गणेशोत्सव, 'या' मराठी माणसाने सुरू केला होता उत्सव... - Ganeshotsav In Pakistan
- युगांडा येथे पारंपरिक गणेशोत्सव; छत्रपती संभाजीनगर येथील अनंत पांडव यांचा पुरोहित म्हणून सन्मान - Ganeshotsav 2024