मुंबई Odisha Woman Killed In Mumbai : ओडिसाच्या महिलेचा प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना गोरेगाव पूर्वमधील एका घरात मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिव्या टोपो (वय 29) असं मृत महिलेचं नाव आहे. वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितलं की, "मंगळवारी सकाळी 11 वाजता या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे." या महिलेचा पती जयराम लाक्रा हा फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ओडिसाचं मजूर जोडपं रोहत होतं गोरेगावात :दिव्या ही तिचा पती जयराम लाक्रा (वय 30) याच्यासोबत गोरेगाव पूर्व येथील अशोक नगर भागात गेल्या दोन वर्षांपासून राहात होती. हे जोडपं मूळ ओरिसाचं रहिवासी असून दोघंही रोजंदारीवर काम करतात. घरमालकाचं राहत्या घराच्या खाली दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या घरातून उग्र वास येत होता. सुरुवातीला घरमालकानं प्राणी मेला असं समजून दुर्लक्ष केलं. मात्र दुर्गंधी वाढल्यानं त्यांनी मंगळवारी दाम्पत्याच्या घरी जाऊन तपासणी केली, तेव्हा या घटनेला वाचा फुटली.