छत्रपती संभाजीनगर MPSC News :स्पर्धा परीक्षांचा घोळ सातत्यानं समोर येत आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत (Taluka Sports Officer) लावलेल्या निकालाबाबत औरंगाबाद खंडपीठातील मॅट न्यायालयानं नोटीस बजावली आहे. दोन जाहिरात, एक परीक्षा आणि दोन निकाल लावण्यात आले असून त्यात मोठी तफावत असल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे. पहिला निकाल लावल्यानंतर तो रद्द करून दुसरा निकाल लावण्यात आला. त्यात तब्बल सोळा परीक्षार्थी खेळाडूंना वगळण्यात आले. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
परीक्षेत पुन्हा गोंधळ :2023 मध्येतालुका क्रीडा अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतली. त्यासाठी 15 जागांसाठी पहिली जाहिरात 29 जुलै 2022 रोजी काढण्यात आली. त्यासाठी अनेक खेळाडूंनी अर्ज केला, मात्र परीक्षा झालीच नाही. तब्बल दहा महिन्यांनी 16 जागांसाठी दुसरी जाहिरात 19 मे 2023 रोजी काढण्यात आली. त्यावेळी पुन्हा खेळाडूंनी अर्ज केले. दोन्ही जाहिरातींची एकच परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल लावण्यात आला. ज्यामध्ये जवळपास 80 खेळाडू पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आले. मात्र, काही दिवसात एक परिपत्रक काढून निकाल स्थगित करण्यात येत असल्याचं नमूद केलं. दुसरा निकाल जाहीर केला त्यावेळी 17 उमेदवारांची नावे वगळण्यात आली. ही नावे का वगळले याबाबत कुठलीच माहिती देण्यात आली नाही. प्रशासकीय कारणाने निकालात स्थगिती दिली असं सांगण्यात आलं. मात्र नेमकं कारण नसल्यानं न्यायालयात गेल्याची तक्रारदार क्रिकेटपटू आणि कराटे प्रशिक्षक सोनम तांदळे आणि छत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांनी सांगितलं.