मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई पोलीस दलातील आठ अतिरिक्त पोलीस आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2184 पोलीस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात असणार आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहआयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक , बीडीएस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगल नियंत्रण पथक, होमगार्ड अशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी, शॉपिंग मॉल, हॉटेल, समुद्रकिनारे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून नागरिक जल्लोषात नवीन वर्ष स्वागत करतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित व्हावी, यासाठी सज्जता ठेवली आहे.
- नाकाबंदीमध्ये वाढ-नववर्ष स्वागतासाठी घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या तपासणीसाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. फिरता बंदोबस्त आणि फिक्स पॉइंट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम-ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्ती, महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या व्यक्ती, अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणारे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. नववर्षाचे स्वागत करताना कोणतेही बेकायदा कृत्य होणार नाही, याची काळजी आणि दक्षता घेऊन नववर्ष उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ मदतीसाठी 100 क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.