मुंबई Swapna Patkar Case:सांताक्रूज भागातील सायकॉलॉजिस्ट स्वप्ना पाटकर यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात लवकरच पावले उचलली जातील; मात्र संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वप्ना पाटकर यांना फोनवरून धमकी दिल्याचंही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (4 मे) पत्रकार परिषदेत सांगितलं. स्वप्ना पाटकर यांना संरक्षण देऊन राऊत यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे त्रास देणे शक्य :पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे निवेदन दिलं. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा छळ करण्यात येत आहे. माझ्यावर दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसंच माझा सातत्याने पाठलाग करण्यात येत आहे. नुकताच माझा बीकेसीवरून पाठलाग करण्यात आला असंही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. संजय राऊत यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच मला त्रास देणे त्यांना शक्य होत आहे. आपण त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्या पक्षाचे नेते चुकीच्या कृत्यांचं समर्थन करत आहेत. संजय राऊत यांचे वरिष्ठ आणि त्यांची टोळी फक्त धमक्या देण्यासाठी फोन करतात, समस्या सोडवण्यासाठी नाही असंही स्वप्ना पाटकर यांनी या निवेदनात म्हटलं आहे.