नाशिक Attack on Doctor in Nashik : नाशिकात सुयोग रुग्णालयाचे संचालक डॉ कैलास राठी यांच्यावर अज्ञात तरुणाकडून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात डॉ राठी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रुग्णालयामधील पीआरओ रोहिणी यांचा पती राजेंद्र मोरे (रा. गंगापूर) यांच्यासोबत डॉक्टर राठी यांनी म्हसरुळ परिसरात प्लॉट खरेदी केला आहे. या प्लॉटच्या व्यवहाराचे 15 ते 16 लाख रुपये डॉक्टर राठी यांना घेणे होते. दोन वर्षापासून हा वाद सुरू होता. डॉक्टर राठी पैशांचा तगादा लावत असल्याने संशयिताने त्यांच्यावर हल्ला केला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे
अज्ञाताकडून डॉक्टरवर सपासप वार : मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील पंचवटी भागात डॉ कैलास राठी यांचं सुयोग रुग्णालय आहे. नेहमीप्रमाणे राठी हे रुग्णालयामध्ये असताना अचानक एक अज्ञात व्यक्ती शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास रुग्णालयामध्ये दाखल झाला. त्यानं डॉ राठी यांच्यावर कोयत्यानं सपासप 15 ते 18 वार करत तिथून पळ काढला. रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी डॉ राठींना तत्काळ गंभीर अवस्थेत अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरवर हल्ला का करण्यात आला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा शहरातील डॉक्टरांनी निषेध व्यक्त केलाय.