नाशिक Nashik Crime News :समाजात गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना नुकतीच नाशिक इथं घडली आहे. एमपीडीए अंतर्गत तुरुंगात असलेल्या एका 'भाई'ची सुटका झाल्यानंतर त्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शहरात मिरवणूक काढली. पोलिसांना ही माहिती मिळताच मिरवणूक पोलीस ठाण्यात वळवत भाईच्या सहा समर्थकांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे यात दोन जण तडीपार असल्याचं समोर आलं आहे. शहरात कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी खपून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या घटनेनंतर दिला आहे.
कारागृहातून सुटका झाल्यानं भाईची काढली वरात :सराईत गुन्हेगार हर्षल सुनील पाटणकर यास पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलं होतं. मंगळवारी त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर सांयकाळच्या सुमारास शहरातील शरणपूर रोड ते आंबेडकर चौक साधू वासवानी रोड या परिसरातून या सराईत गुन्हेगाराच्या समर्थकांनी वाजत -गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत चार चाकीसह वीस हून अधिक दुचाकीवर समर्थक सहभागी झाले होते. यातील पाटणकर समर्थकांनी परिसरातून अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी करीत कर्कश हॉर्न वाजत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. संबंधित प्रकणाची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होत, त्यांनी मिरवणूक थेट पोलीस ठाण्यात वळवली. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी संशयित हर्षद पाटणकर याच्यासह जॉन मायकल, वैभव खंडारे, गोपाल नागोरकर, शॉन मायकल, वेदांत चाळदे, विकास नेपाळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या मिरवणुकीमधील वेदांत चाळदे आणि गोपाळ नागोरकर हे दोघंही तडीपार गुंड सहभागी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.