नाशिक Girlfriend Viral Morphed Photos :प्रेम संबंध तोडण्याच्या रागातून एका युवतीनं प्रियकराच्या नावे सिमकार्ड घेत त्याचे सोशल मीडियावर अकाउंट उघडून अश्लील फोटो व्हायरल केले. तरीदेखील प्रियकर आपल्याकडे परत येत नसल्यानं प्रियकराच्या बहिणीचे फोटो मॉर्फिंग करत ते सोशल मीडियावर स्टेटस ठेवत बदनामी केली. या प्रकरणी संशयित युवती विरुद्ध नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकाच्या वडिलांची पोलिसात धाव:चार वर्षे एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या नात्यात काही कारणानं वितुष्ट निर्माण झालं. यानंतर प्रियकर आणि प्रेयसीनं परस्पर संमतीनं ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतरही मनात राग धरून असलेल्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराचे फोटो चक्क मॉर्फिंग करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे परराज्यात नोकरीला असलेल्या युवकाचं दुसऱ्या युवती सोबत जमलेलं लग्न मोडलं. प्रेयसीनं आपल्या एकेकाळच्या प्रियकराला दगा फटका देत त्याचा जमलेला विवाह मोडून टाकला. नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या युवकाच्या वडिलांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. यानंतर सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये त्या प्रेयसी युवती विरोधात गुन्हा दाखल केला. युवक आणि त्याच्या बहिणीचे व्हायरल केलेले मॉर्फिग फोटो हे त्या प्रेयसीकडूनच करण्यात आले आहे का? याची पडताळणी आता सायबर पोलीस करत आहे.
मेटाकडून प्रेयसीच्या अकाउंटची माहिती मागवली:नाशिक सायबर पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर इन्स्टाग्रामच्या मूळ मेटा कंपनीकडून त्या प्रेयसीच्या अकाउंट बाबतची माहिती मागवली आहे. तसेच मॉर्फिग केलेल्या फोटोचीही पडताळणी पोलिसांनी सुरू केली आहे. संशयित युवतीच्या मागावर पथक आहे. तिनं युवकाच्या नावे सिमकार्ड कुठून घेतलं? सोशल मीडियावर अकाउंटद्वारे कुठल्या पोस्ट केल्या, याचा पोलीस तपास करत आहेत. यासह युवकाच्या बहिणीचे फोटो मॉर्फिग केल्यानं या गुन्ह्याचा गांभीर्यानं तपास सुरू आहे, असं सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितलं.