महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आरोपीसह सीबीआयला नोटीस - Narendra Dabholkar killing - NARENDRA DABHOLKAR KILLING

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं यातील आरोपी आणि तपासयंत्रणा सीबीआयला नोटीस जारी केली आहे.

Narendra Dabholkar killing
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 9:19 PM IST

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. या प्रकरणात खंडपीठानं आरोपी आणि सीबीआयला नोटीस बजावली. आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात मुक्ता दाभोलकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.


नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी अभय नेवगी यांच्यामार्फत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दाभोलकर यांची हत्या ही सुनियोजित हत्या होती. त्यात मोठा व्यापक कट होता, असे उच्च न्यायालयात दाखल याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.


याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे -दाभोलकरखटल्यातील दोषी आणि निर्दोष ठरवण्यात आलेले आरोपी हे उजव्या विचारसरणीच्या सनातन संस्थेचे सदस्य आहेत. याकडे सत्र न्यायालयानं आवश्यक तेवढे लक्ष दिले नाही, असा आक्षेप मुक्ता दाभोलकर यांनी याचिकेत घेतला आहे. सनातन संस्था, हिंदू जन जागरण समिती आणि इतर तत्सम संघटनांविरुद्ध आपले मत व्यक्त करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना संपवण्यासाठी आरोपींनी हे षडयंत्र रचले होते,' असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक करत असताना सनातन संस्थेशी संबंध असलेल्या दोन व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

दोषी आरोपींना युएपीएमध्ये निर्दोष ठरवण्याला आव्हान -या खटल्यात दोषी ठरलेल्या अन्य दोन आरोपींना गुन्हेगारी कट रचल्याच्या गुन्ह्यातून आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्य (युएपीए) केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते. या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे. या खटल्यातून वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन अन्य आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 16 अन्वये आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले. त्याविरोधात याचिकेद्वारे दाद मागण्यात आली आहे.

समज होण्यात काहीतरी त्रुटी राहिली-10 मे 2024 रोजी पुण्यातील सत्र न्यायालयानं अंदुरे आणि काळसकर यांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, उर्वरित तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पुनाळेकर यांच्यावर केवळ पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गुन्हेगारी कटामध्ये सहभागी असल्याचे पुरावे नसल्याबाबत समज होण्यात काहीतरी त्रुटी राहिली, असे याचिकेत मांडण्यात आले आहे.

  • सर्व आरोपी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील कटामध्ये सहभागी होते. हे सिद्ध करण्याचे पुरावे तपास यंत्रणांनी सादर केले होते. हे सत्र न्यायालयाकडून अमान्य करण्यात आल्याविरोधात याचिकेत दाद मागण्यात आली आहे.

हेही वाचा-

  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यास सीबीआयची अक्षम्य दिरंगाई - Narendra Dabholkar murder case
  2. विचारवंतांना असलेला धोका अजून संपलेला नाही, तिन्ही आरोपींच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात जाणार-हमीद दाभोलकर - Narendra Dabholkar Case Verdict

ABOUT THE AUTHOR

...view details