मुंबई -येत्या२० नोव्हेंबर विधानसभा निवडणुका होणार असून, निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. तर पुढील एक-दोन दिवसात जागावाटपाबाबत निर्णय होईल, असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होते की काय? असं चिन्ह निर्माण झालंय. कारण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्यामुळं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे जागा वाटपाच्या बैठकीत जर नाना पटोले असतील तर आम्ही सहभागी होणार नाही, अशी ताठर भूमिका ठाकरे गटाने घेतलीय. यामुळं आघाडीत बिघाडी होणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
हाय कमांडशी चर्चा करणार :जागा वाटपासंदर्भात दिल्लीतील काँग्रेसच्या हाय कमांडची भेट घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षातील नेते पक्षातील पक्षप्रमुखांना जागा वाटपाबाबतची माहिती देत असतात. परंतु आता संजय राऊत जर दिल्लीला जाऊन आमच्या हाय कमांडशी चर्चा करणार असतील तर यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले होते. दुसरीकडे जागा वाटपाच्या चर्चेत नाना पटोले हे घटक पक्षाचे ऐकत नाहीत किंवा त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाहीत, असा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केलाय. जागा वाटपात विदर्भातील काही जागांवरून अजूनही महाविकास आघाडीत एकमत होत नाही. त्यामुळं अद्यापपर्यंत यावर तोडगा निघाला नाही.
हा क्षणिक वाद :नाना पटोले बैठकीत असतील, तर आम्ही सहभागी होणार नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांना विचारला असता, "खरं तर ही बातमी सूत्रांकडून समजतंय, अधिकृत बातमी नाही. पण जर ही बातमी खरी असेल तर हे योग्य नाही. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळेच ठाकरे गटाने अशी भूमिका घेणे योग्य नाही. तसेच हा क्षणिक वाद असल्याची प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिलीय. दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांचीही यावर प्रतिक्रिया समोर आलीय. "लोकसभा निवडणूकवेळी देखील तुम्ही जो वाद म्हणता तो झाला होता. पण याला आम्ही चर्चा म्हणतोय. मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सुंदर यश मिळाले होते. विधानसभा निवडणुकीवेळीदेखील चर्चा आणि थोडा वाद होऊ द्या. आम्हालाच चांगले यश मिळेल आणि वाद वगैरे काही नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. ठाकरे गटातील नेत्यांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महाविकास आघाडीत बिघाडी! पटोले बैठकीत असल्यास आम्ही बैठकीत सहभागी होणार नाही, ठाकरे गटाची भूमिका - NANA PATOLE
जागा वाटपाच्या बैठकीत जर नाना पटोले असतील तर आम्ही सहभागी होणार नाही, अशी ताठर भूमिका ठाकरे गटाने घेतलीय.

महाविकास आघाडी (ETV Bharat File Photo)
Published : Oct 18, 2024, 4:43 PM IST