नागपूर Nagpur Audi car accident case - नागपूरच्या बहुचर्चित ऑडी कार अपघात प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे तसंच रोनित चिंतमवार या दोघांचा मध्यपान केल्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. अर्जुन हावरेच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये शंभर मिलिलिटर रक्तात अल्कोहोलचे प्रमाण केवळ २८ मिलिग्रॅम एवढे आले आहे. तर रोनित चिंतमवारच्या रक्तात ते प्रमाण २५ मिलिग्रॅम एवढे आहे. बावनकुळेचे रक्तच घेतले नाही, त्यामुळे त्याच्या रिपोर्टचा काही प्रश्नच येत नाही.
नियमानुसार अर्जुन, रोहित दारूच्या अंमलाखाली नव्हते - नियमाप्रमाणे फॉरेन्सिक चाचणीत १०० मिलिलीटरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण ३० मिलीग्राम आले, तर ती व्यक्ती दारूच्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. दरम्यान या प्रकरणी दोघांची वैद्यकीय चाचणी अपघातानंतर तब्बल ७ तासांनी झाल्यामुळे रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती अचूक आहे, या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. आता दोघांच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण फोरेन्सिक रिपोर्टमध्येही सिद्ध झाल्यानंतर पोलीस याप्रकरणी पुढे काय कारवाई करतात, वाहन चालवणारा अर्जुन हावरे दारूच्या अंमलाखाली होता हे मान्य करतात का आणि या प्रकरणी आणखी कठोर कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
अर्जुन हावरे व रोनित चिंतमवार या दोघांचे रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यात दोघांनी कमी प्रमाणात दारू प्राशन केली असल्याचा अहवाल समोर आले असले तरी नियमानुसार कारवाई केली जाईल. - डीसीपी राहुल मदने
संकेत बावनकुळेची झाली चौकशी -सुरुवातीच्या तपासात संकेत बावनकुळे गाडीत होता की नाही या संदर्भात स्पष्टता नव्हती. मात्र तपासात ही बाब समोर आलेली आहे की, संकेत बावनकुळे गाडीत होता. अर्जुन आणि रोनीतला ताब्यात घेऊन आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं स्पष्ट झालं, म्हणून काल रात्री संकेतला बोलावून चौकशी केली असल्याचं पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितलं आहे. तिघे रात्री हॉटेलमधून जेवण करून येत होते असं देखील तपासात स्पष्ट झालं आहे. मात्र, संकेत बावनकुळे याने देखील मद्य प्राशन केलं होतं की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
आमच्यावर दबाव नाही -अपघात प्रकरणाचा तपास करताना आमच्यावर कुणाचाही राजकीय दबाव नाही. अपघाताचे सीसीटीव्ही डिलीट केले हे सत्य नाही. अशी माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मदने यांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेजचे गौडबंगाल - नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाहोरी बार आणि रेस्टॉरंटच्या आतमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार हे दिसत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज तर कुणी गायब केलेलं नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधित हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह पाहण्याची सोय असून रेकॉर्डिंग डीव्हीआर मध्ये झालेलं नाही.त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकानं जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चारही तरुण तिथे गेले असताना ही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाल्याचं दिसून आलेलं नाही.पोलिसांनी पुढील तपासणीसाठी हॉटेलचा डीव्हीआर जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस या डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणीही करणार आहेत. त्यामुळे जर काही फुटेज त्याच्यामधून डिलीट केले गेले असतील, तर ते नक्कीच फॉरेन्सिक चाचणीत समोर येईल असं पोलीस अधिकाऱ्यांचा म्हणणं आहे.
हेही वाचा..
- ऑडी हिट अँड रन प्रकरण; सुषमा अंधारे यांनी केला पोलिसांचा 'पंचनामा', संकेत बावनकुळेला सोडल्याचा आरोप - Audi Hit and Run Case
- 'ऑडी' अपघात प्रकरणी मुलावर कारवाई होणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी थेटच सांगितलं... - Chandrashekhar Bawankule
- अपघातावेळी ऑडीमध्ये कोण होतं? अखेर नागपूर पोलिसांनी केला खुलासा - Audi Hit and Run Case