नागपूर Nagpur Accident News : भरधाव कारमध्ये स्टंटबाजी करणं आणि मोबाईलवर रील बनवणं दोन तरुणांच्या जिवावर बेतलं आहे. भरधाव कार दुभाजकावर जाऊन आदळल्यानं झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नागपूर कोराडी मार्गावरील पांजारा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलाय.
अपघातात दोघांचा मृत्यू: विक्रम गादे आणि आदित्य पुण्यपवार अशी मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान विक्रम गादे, आदित्य पुण्यपवार, जय घनश्याम भोंगाडे, सुजल प्रमोद चव्हाण आणि सुजय राजन मानवटकर हे पाच तरुण कारने कोराडीच्या दिशेने निघाले असताना हा अपघात झाला.
स्टंटबाजी करताना कार दुभाजकावर आदळली : कोराडी नागपूर मार्गावरील पांजरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही तरुण कारने स्टंटबाजी करत होते. तर काही मोबाईलवर स्टंटबाजी रिल्स स्वरूपात रेकॉड करत होते. त्याचवेळी अतिशय सुसाट वेगाने पळत असलेल्या कारवरील तरुणांचे नियंत्रण सुटले आणि भरधाव अनियंत्रित कार थेट ६ बॅरिकेड्स तोडून दुभाजकावर जोरात आदळली. ज्यामध्ये दोन तरुणांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.