यंदाच्या वर्षाला निरोप देत असताना मराठी रंगभूमी, दूरचित्रवाणी, सिनेमा, कला आणि साहित्यिक क्षेत्रात अनेक प्रतिभावंताना या जगाचा निरोप घेतला. यामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे, हरहुन्नरी कलावंत विजय कदम, ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु पंडिता डॉ. सुजाता सुरेश नातू, पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज, गीतकार मंगेश कुलकर्णी, ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक एन. रेळेकर, अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे, लेखिका डॉ. वीणा विजय देव आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार मनोहर सप्रे या दिग्गजांचा समावेश आहे. आजच्यालेखात आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे 13 जानेवारी 2024 रोजी पुण्यात पहाटे निधन झालं. पहाटे झोपेत असताना 91 वर्षांच्या प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर त्यांना उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. 'भारतरत्न' दिवंगत पं. भिमसेन जोशी यांच्या साथीने आणि पश्चात त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ 'किराणा' घराण्याची शास्त्रीय गायन परंपरा निष्ठेने पुढे केली. शास्त्रीय संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत केंद्र सरकारच्या वतीने त्यांना 1990 साली 'पद्मश्री', 2002 साली 'पद्मभूषण' आणि 2022 साली 'पद्मविभूषण' या देशाच्या चौथ्या, तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं.
उत्तम शास्त्रीय गायिका असण्याबरोबरच त्या शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, संगीत दिग्दर्शक, लेखिका म्हणूनही प्रसिद्ध होत्या. आपल्या प्रदीर्घ कला कारकिर्दीतही त्यांनी कायम प्रयोगशीलतेची कास सोडली नाही. गायकीबरोबरच कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकारातही त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. भारतीय पारंपरिक शास्त्रीय संगीत देशाची वेस ओलांडून जगभर नेण्यात त्यांचं अनन्यसाधारण योगदान राहिलं आहे.
विजय कदम
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं 10 ऑगस्ट 2024 रोजी दीर्घ आजारानं निधन झालं. अभिनेते विजय कदम हे मागील काही दिवसांपासून कर्करोगानं ग्रस्त होते. पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेलं 'खंडोबाचं लगीन' या कलाकृतीतून 1979 साली पुरुषोत्तम बेर्डे आणि विजय कदम यांचा एकत्रित नाट्य प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी अजरामर केलेलं 'विच्छा माझी पुरी करा' हे वगनाट्यही त्यांनी केलं. आधी एकांकिका आणि नंतर व्यावसायिक नाटक म्हणून देश-विदेशात गाजलेल्या 'टूरटूर' या नाटकातून बेर्डे आणि कदम ही लेखक, दिग्दर्शक - अभिनेता जोडगोळी एकत्र आली आणि त्यांनी धुमाकूळ घातला. ईटीव्ही मराठी'वर दीर्घकाळ चाललेल्या 'टूरटूर' या मालिकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
आनंदी आनंद, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघं राजा राणी, तेरे मेरे सपने, देखणी बायको नाम्याची, रेवती, भेट तुझी माझी सारखे अनेक चित्रपट विच्छा माझी पुरी करा, आम्ही आलो रे सारखी नाटकं आणि होळी रे होळी सारख्या अनेक मालिकांमधून विजय कदम यांचा बहारदार अभिनय रसिकांना अनुभवता आला. 'खुमखुमी' या त्यांच्या 'सबकुछ विजय कदम' विनोदी कार्यक्रमाने देश-विदेशात बहार उडवून दिली. त्यांची पत्नी पद्मश्री कदम (पूर्वाश्रमीची जोशी) यांनीही काही काळ अभिनेत्री म्हणून कलासृष्टीला उत्तम योगदान दिलं. अभिनेत्री पल्लवी जोशी (अग्निहोत्री), अभिनेता मास्टर अलंकार हे विजय कदम यांचे अनुक्रमे मेहुणी आणि मेहुणे तर पल्लवी यांचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे विजय कदम यांचे साडू. विजय कदम हे आपल्या सर्व नातेवाईक तसंच हजारो चाहत्यांना दुःखसागरात लोटून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले आहेत.
ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु पंडिता डॉ. सुजाता सुरेश नातू
ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु पंडिता डॉ. सुजाता सुरेश नातू यांचे 6 ऑक्टोबर रोजी पुणे येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. पुण्यासारख्या ठिकाणी ज्या काळात कथक नृत्यकलेकडे अवहेलनेने पहिले जात होते त्या नृत्यकलेला जनमानसात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात आणि ती कला घराघरात पोहोचविण्यात डॉ. सुजाता नातू यांचे मोठे योगदान होते. महाविद्यालयीन जीवनात अॅथलेटिक्स आणि खो -खोमध्ये त्या पारंगत होत्या. तसेच विद्यापीठाच्या त्या कप्तान देखील होत्या. रनिंगमध्ये ऑलिंपिक सिलेक्शनपर्यंत त्यांनी मजल मारली होती. वयाच्या ९ व्या वर्षापासून जयपूर घराण्याचे गुरु पंडित सुन्दरलालजी आणि पंडित कुंदनलालजी यांच्याकडे त्यांनी डिप्लोमा ते एम. म्युज. पर्यंत कथक नृत्यशिक्षण घेतलं.
पंडित नेहरू, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी, एडमंड हिलरी यांसारख्या मान्यवरांपुढे त्यांनी एकल नृत्य सादरीकरण केले. १९६२ मध्ये युपीएससीची परीक्षा देऊन त्यांनी ऑल इंडिया रेडीओमध्ये ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह म्हणून ८ वर्षे नोकरी केली.१९६७ मध्ये विवाहानंतर मुंबई येथे 'पदन्यास' नृत्यसंस्थेची स्थापना केली. मुंबई आणि कलकत्ता येथे नृत्य वर्ग घेतलेआणि अनेक कार्यक्रम देखील सादर केले.
१९७० पासून आजपर्यंत पदन्यास तर्फे शेकडो मुलींनी कथक प्रशिक्षण घेतले असून अनेक रंगमंचीय कार्यक्रम सादर केले आहेत. कथकच्या शास्त्रीय परिपुर्णते बरोबरच आधुनिकतेसाठी डॉ. सुजाता नातू यांनी विविध प्रयोग केले. कथकबरोबर समन्वय साधून शास्त्रीय संगीत, लोक संगीत इतकेच नव्हे तर पाश्चात्य संगीताबरोबर सुद्धा त्यांनी सादरीकरण केले. कथक नृत्याला समाज मान्यता मिळावी हा निदिघ्यास त्यांनी घेतला होता.
मधुरा जसराज
पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचं 25 सप्टेंबर रोजी निधन झालं. मधुरा यांचं वय 86 वर्षांचं होतं. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. मधुरा आणि जसराज यांना दुर्गा जसराज आणि शारंग देव अशी दोन मुले आहेत. लेखक, चित्रपट निर्माता आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून सक्रिय असलेल्या मधुरा यांनी 'संगीत मार्तंड पंडित जसराज' (2009) हा प्रसिद्ध माहितीपट बनवला होता. मधुरा यांचे भाऊ किरण शांताराम हे चित्रपट निर्माता आहेत. मधुरा यांनी वडील व्ही. शांताराम यांचे चरित्रदेखील लिहिलंय. याशिवाय त्यांच्या इतर अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मधुरा आणि पंडित जसराज यांचा विवाह 1962 मध्ये झाला. मुंबईत स्थायिक होण्यापूर्वी ते एक वर्ष कोलकाता येथे राहिले. एका मुलाखतीत पंडित जसराज यांनी सांगितलं होतं की, 6 मार्च 1954 रोजी एका कॉन्सर्टमध्ये ते मधुराला पहिल्यांदा भेटले होते. यावेळी मधुराचे वडील चित्रपट निर्माते व्ही शांताराम 'इनक इनक पायल बाजे' नावाचा चित्रपट बनवत होते." इथे पंडित जसराज यांनी मधुरा यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रुपांतरण झाले. 2010 मध्ये, मधुरा यांनी पहिला मराठी चित्रपट, 'आई तुझा आशीर्वाद' दिग्दर्शित केला होता. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी 'आई तुझा आशीर्वाद'नं चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात वयस्कर आणि नवोदित दिग्दर्शक नोंद झाली. या चित्रपटात पंडित जसराज आणि दिवंगत लता मंगेशकर यांची मराठीतील गाणी होती.
गीतकार मंगेश कुलकर्णी
प्रसिध्द गीतकार, अभिनेता आणि लेखक अशा भूमिका निभावणाऱ्या मंगेश कुलकर्णी यांचं 19 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. कुलकर्णी यांनी पटकथाकार म्हणूनही हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केलं होतं. ते ७६ वर्षांचे होते. दूरचित्रवाणीवर गाजलेल्या लाईफ लाईन या मालिकेची पटकथा त्यांनीच लिहिली होती. तर विजया मेहता यांनी त्या मालिकेचे दिग्दर्शन केलं होतं. १९९७ मध्ये आलेल्या येस बॉस या शाहरुख खानच्या चित्रपटाची पटकथा देखील त्यांनी लिहिली होती. लपंडाव या मराठी चित्रपटाच्या लेखनाने त्यांनी प्रारंभ केला होता. 'दिल क्या करे', 'गुलाम ए मुस्तफा', 'राजा को रानी से प्यार हो गया' या हिंदी चित्रपटासाठी कुलकर्णी यांनी लेखन केलं होतं.
२००२ मध्ये त्यांनी आवारा पागल दिवाना चित्रपटाची पटकथेचं लिखाण केलं होतं. मराठीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या लेखनानं मोठं योगदान दिलं . २०१७ मध्ये त्यांनी फास्टर फेणे या रहस्यमयी गुन्हेगारी मालिकेचे लेखन केलं होतं. 'आभाळमाया'चे शीर्षकगीत त्यांना बस प्रवासात सुचले होते. त्यामुळं त्यांनी त्याच्या ओळी बसच्या तिकीटावर लिहिल्याची आठवण कुलकर्णी यांनी एकदा सांगितली होती.
ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक एन. रेळेकर
मराठी चित्रपटाचे ज्येष्ठ दिग्दर्शक एन रेळेकर यांचं यावर्षी ऑक्टोबरच्या 17 तारखेला कोल्हापूरात राहत्या घरी निधन झालं. सात मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह दहा चित्रपटांच्या कथा आणि पटकथांचं लेखन, निळू फुले, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज मराठी चित्रपट कलावंतांबरोबर काम, सुमारे 150 नाटकांचे संहितालेखन असं एन रेळेकर यांचं मराठी चित्रपट विश्वात मोठं योगदान आहे. मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवणारे नारायण उर्फ एन. रेळेकर उतारवयात मात्र जगण्यासाठी संघर्ष करत होते. ज्या हाताने लेखन करून मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली अशा हातांनाच आता आधार नव्हता. सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या तीन हजारांच्या पेन्शनमध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या कलासक्त रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेला आहे.
अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे
मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेता अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर पहिले उपचारच चुकले होते. त्यांच्या पँक्रियाला बाधा झाली आणि अडचणीत वाढ झाली. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना त्यांना डॉक्टरांनी दीड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचं त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योग्य उपचारांना सुरूवात झाली आणि केमोथेरपी केली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे पूर्णपणे बरे झाले. अलिकडच्या काळात त्यांना कोणताही त्रास होत नव्हता. मात्र, त्यांचं निधन झालं. रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही.
हिंदी चित्रपटांमध्येही काम : अतुल परचुरे यांनी मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. त्यांनी मराठी दूरचित्रवाणीच्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपट सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. अनेक मराठी नाटकांमधील अतुल परचुरे यांनी केलेल्या भूमिका गाजलेल्या आहेत. त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. अतुल परचुरे यांनी केलेली पु ल देशपांडे यांची भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. अतुल परचुरे यांच्या अकाली एक्झिटनं मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
नाटकांमधील भूमिका खूपच गाजल्या : अतुल परचुरे यांनी केलेल्या वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील भूमिका खूपच गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. इतरही अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या.
डॉ. वीणा विजय देव
प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. वीणा देव यांचं 29 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालं. सुप्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकर यांच्या त्या कन्या तर मृणाल कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या. गेल्याच वर्षी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता. त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली. डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्यात. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिलीत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिलाय. १९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केलेत. तसेच गो. नी. दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो. नी. दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे अनेक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो. नी. दा. यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत. वीणा देव यांचे प्रा. विजय देव यांच्याबरोबर लग्न झाले होते. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या वीणा देव व विजय देव यांच्या कन्या आहेत.
ख्यातनाम व्यंगचित्रकार मनोहर सप्रे
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा लेखक मनोहर सप्रे यांचं 14 डिसेंबर 2024 रोजी चंद्रपूर इथं निधन झालं. मनोहर सप्रे यांची अनेक व्यंगचित्रं देशभर गाजली. मनोहर सप्रे यांनी विविध वृत्तपत्रातून त्यांची व्यंगचित्रे चांगलीच गाजली होती. व्यंगचित्र आणि शिल्पकला क्षेत्रात त्यांचे महत्वाचं योगदान आहे. तर त्यांच्या कला प्रदर्शनाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी हजेरी लावली होती.
सप्रे यांचं पहिलं व्यंगचित्र जून 1957 ला प्रसिद्ध झालं. केवळ ध्यास म्हणून व्यंगचित्रनिर्मितीकडं वळलेल्या सप्रे यांनी जराही खंड पडू न देता अक्षरशः हजारो व्यंगचित्रं रेखाटली. सुरुवातीला नागपूर येथील एका मासिकासाठी त्यांनी काम केलं. 1962 पासून 1984 पर्यंतच्या तब्बल 22 वर्षे त्यांनी मुंबईच्या एका दैनिकासाठी व्यंगचित्रकार म्हणून काम केलं. विशेष म्हणजे चंद्रपुरात राहून त्यांनी हा प्रपंच चालविला. तत्कालीन राजकीय-सामाजिक स्थितीवर त्यांनी त्यांच्या कुंचल्यानी केलेली फटकेबाजी खूप गाजली. यानंतर त्यांनी नंतर नागपूरच्या एका दैनिकासाठी आठ ते दहा वर्षे, नागपूरच्या आणि पुण्याच्या वृत्तपत्रासाठी देखील व्यंगचित्रनिर्मिती केली. व्यंगचित्रांबरोबरीनं काष्ठशिल्पांचा छंदही त्यांनी तेवढ्याच मनस्वितेनं जोपासला. मिळतील तेथून सुंदर-सुंदर कलात्मक, दुर्मीळ काष्ठशिल्पं जमा करून त्यांनी संग्रह केला. केवळ भारतातच नव्हे, तर फ्रान्समध्ये सिर्केना आणि अमेरिकेत फिलाडेल्फिया इथं प्रदर्शनं भरवली.