महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपाडा, भेंडी बाजारातील मुस्लिम मतदार ठाकरे गटासोबत - Lok Sabha election 2024

Lok Sabha election : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत मुस्लिम मतं निर्णायक ठरणार आहेत. 13 लाख मतदार संख्येत सुमारे अडीच ते तीन लाख मुस्लिम मतदार असून यातील बहुसंख्य मतदार सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूनं मतदान करण्याच्या विचारात आहेत. 92 च्या दंगलीत शिवसेनेविरोधात असलेला हा मतदार आता धर्मनिरपेक्ष विचारांच्या शिवसेनेसोबत उभा राहिल्याचं चित्र दिसत आहे. ही शिवसेनेसाठीसुद्धा स्वागतार्ह बाब असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 10:48 PM IST

Lok Sabha election
मुस्लिम मतदार ठाकरे गटासोबत (Reporter ETV Bharat Maharashtra Desk)

मुंबईLok Sabha election :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा वरळी, भायखळा, मलबार, शिवडी, कुलाबा या मतदारसंघांचा मिळून तयार झाला आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी, गुजराती, मुस्लिम समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. भेंडी बाजार, नागपाडा, मदनपुरा, आदम मिस्त्री गल्ली, भायखळा, क्रॉफर्ड मार्केट, डोंगरी, मोहम्मद अली रोड, वरळी येथील जिजामाता नगर, भायखळा पश्चिमचा काही भाग या लोकवस्तीत सुमारे 25 टक्के मुस्लिम मतदार राहतात.

महायुती, महाविकास आघाडीचा चुरशीचा सामना :या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसत असला तरी प्रत्यक्षात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रतिष्ठेचा सामना या मतदारसंघात पाहायला मिळतो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यात ही लढत होत आहे.

मुस्लिम मते निर्णायक :या मतदारसंघात एकूण 13 लाख मतदारांची संख्या आहे. मात्र, जर समाज निहाय वर्गीकरण केलं, तर सुमारे 25 टक्के मतदार हे मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळं या मतदारांची संख्या अडीच ते तीन लाखांच्या घरात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी काँग्रेस पक्षाला पसंती दिली होती. या निवडणुकीत खासदार अरविंद सावंत यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडणूक लढवत होते. मात्र, मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. अरविंद सावंत यांना चार लाख 14 हजार मते मिळाली तर, मिलिंद देवरा यांच्या पारड्यात तीन लाख 22 हजार मते मिळाली होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत हे चित्र पालटल्याचं या मतदारसंघात दिसतंय.

मुस्लिम समाज ठाकरे गटासोबत :या मतदारसंघातील 25% मतदार संख्या असलेल्या मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरणार असून ती कुणाच्या पारड्यात पडतात याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात मोहम्मद अली रोड येथील मुस्लिम समाजसेवक आसिफ शेख यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही आतापर्यंत काँग्रेसला मतदान केलं. आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आहेत. त्यामुळं आम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सुरू असलेलं जातीय राजकारण याला जबाबदार आहे. भारतीय जनता पक्षाकडून मुस्लिम समाजाला वारंवार टार्गेट केलं जात आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या मंगळसूत्राचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. काँग्रेस तुमचं मंगळसूत्र घेऊन मुसलमानांना देईल, असं पंतप्रधान म्हणाले. त्यामुळं आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांना मुसलमान समाजाचा उल्लेख न करता हा मुद्दा मांडता आला असता, असे शेख म्हणतात. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण शिंदे सरकारनं रद्द केलंय. त्यामुळं आम्ही भाजपाच्या मित्र पक्षालाही मदत करायची नाही, असं ठरवलं आहे.

1992 च्या दंगलीनंतर मुस्लिमांचं मतपरिवर्तन :1992 मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीत भेंडी बाजार नागपाडा येथील मुस्लिम समाजाविरुद्ध दादर परळ लालबाग येथील मराठी समाज असे चित्र रंगवलं गेलं होतं. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम विरोधात थेट भूमिका घेतली. त्यामुळं गेल्या काही निवडणुका पाहिल्या, तर मुस्लिम समाजानं मुस्लिम उमेदवाराला किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचा पॅटर्न या मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली बदललेली राजकीय नीती, सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्ष धोरण अवलंबिल्यानं आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात ठाकरे गटासोबत जाण्यास इच्छुक आहे, असंही शेख यांनी सांगितलं.

प्रबोधनकार ठाकरे यांचा खरा वारसा : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आहे. प्रबोधनकार ठाकरे हे अत्यंत पुरोगामी विचारांचे आणि सर्वधर्मसमभाव मानणारे समाजसुधारक होते. 1992 च्या जातीय दंगलीनंतर शिवसेनेची निर्माण झालेली प्रतिमा अल्पसंख्याक समाजला शिवसेना पक्षापासून दुरावण्यासाठी कारणीभूत ठरली. मुंबईमध्ये सर्व धर्माची नागरिक नोकरी धंद्यानिमित्त आलेले आहेत. त्यांना स्वतःचं पोट भरण्यापलीकडं फारशी राजकीय उठा ठेव करायची नाही. मात्र कित्येकदा धार्मिक आणि जातीय किंवा भाषिक वाद निर्माण करून या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जातो. मात्र सर्वसामान्य जनतेला यात रस नाही. त्यांना त्यांचे आयुष्य शांततेत जगायचं आहे, असे सावंत सांगतात.

उद्धव ठाकरेंना होणार फायदा :1992 नंतर शिवसेना आणि अल्पसंख्याक समान याच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यांची मते ही शिवसेनेला मिळत नव्हती, मात्र आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. या भूमिकेचा उद्धव ठाकरे यांना निश्चितच फायदा होतो आहे. त्यामुळंच आता मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत यायला तयार झाला आहे. त्यांची ही बदललेली भूमिका त्यांना केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवरसुद्धा उपयोगी पडणार आहे. त्यांच्या पक्षाचा केवळ हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी असा असलेला चेहरा आता बदलला जात असून त्यांना राष्ट्रीय स्तरावरसुद्धा स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे. त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला पाहिजे, असंही सावंत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातसुद्धा 17 मुस्लिम सरदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा हीच विचारधारा मांडली होती. त्यामुळं तो वारसा आता उद्धव ठाकरे यांनी पुढं चालवला पाहिजे, असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. "वेगवेगळ्या मार्गाने कमावलेले कोट्यावधी रुपये कसे वाचवायचे, या भीतीनेच ..." संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - Kolhapur lok Sabha election 2024
  2. उद्धव ठाकरेंना भगवा ध्वज हातात...; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला - lok sabha election
  3. 'माझ्या लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान’, पंतप्रधान मोदी सॅम पित्रोदावर खवळले - Pm Modi Reaction On Sam Pitroda

ABOUT THE AUTHOR

...view details