छत्रपती संभाजीनगर : अनेक वेळा वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांनी पुन्हा केलेलं विधान वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. राष्ट्रगीत जण गण मन नव्हे, तर वंदेमातरम् असायला हवं, अशी मागणी त्यांनी केली. चलो अयोध्या या चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी ही मागणी केली आहे. "1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं राष्ट्रगीत म्हणजे ते इंग्रजांच्या स्तुतीसाठी होतं. ते देश स्वातंत्र्य झाल्यावर देशाचं राष्ट्रगीत कसं होऊ शकते," असं ते म्हणाले. यावर मी सत्य मांडलं त्याचं विश्लेषण केलं, त्याचा अभ्यास करावा. राष्ट्रगीत प्रबोधन करणारं, स्तुती करणारं असावं, अशी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांच्या वक्तव्यानं आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमच्या राष्ट्रीय प्रतिकांचा संबंध आमच्या भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे त्याच्याशी खेळू नये, असा जोरदार हल्लाबोल अतुल लोंढे यांनी केला आहे.
इंग्रजांचं स्तुतीगीत राष्ट्रगीत कसं ? : मिशन अयोध्या चित्रपटाचं प्रदर्शन 24 जानेवारी 2025 रोजी एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्याहस्ते ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी रामगिरी महाराजांनी मनोगत व्यक्त करताना वंदेमातरम् आपलं राष्ट्रगीत असायला हवं, अशी मागणी केली. "आपण म्हणत असलेलं राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांनी इंग्रज राजा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहलं होतं. यामध्ये देशाचे भाग्य विधाता ते असल्याची स्तुतीसुमने त्यांनी गायली. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानणं योग्य नाही. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांचं शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम होतं. ते काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी इंग्रजांना खूश करण्यासाठी त्यांनी गीत केलं. मात्र यात बदल व्हायला हवा, वंदेमातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं," अशी मागणी महंत रामगिरी महाराज यांनी केली. दरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीतावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तिव्र आक्षेप नोंदवला आहे.
राष्ट्रगीत प्रेरणादायी असावं : "देशाचं राष्ट्रगीत प्रेरणादायी असावं आणि स्तुती करणारं असावं, अशी मागणी त्यांनी केली. यात कोणाचा अवमान करण्याचा मानस नाही. याबाबत आपण अभ्यास केला तर केलेली मागणी सर्वांना पटेल, अस महंत रामगिरी महाराज यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं. त्याचबरोबर देशात सर्व धर्मियांनी एकत्र रहावं, मुस्लीम बांधव यांच्याशी भांडण नाही, काही वाद एकत्र येऊन सोडवायला हवेत," असं रामगिरी महाराज यांनी सांगितलं.
अतुल लोंढे यांचा जोरदार हल्लाबोल : महंत रामगिरी महाराज यांनी भारतीय राष्ट्रगीतावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या प्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर हल्लाबोल केला. आमच्या राष्ट्रीय प्रतिकांचा संबंध आमच्या भावनांशी जोडलेला आहे. मात्र काही लोक देशाची अस्मिता असलेल्या प्रतिकांना अगोदरपासून लक्ष्य करत आले आहेत. मग देशाचं संविधान असेल, देशाचा तिरंगा झेंडा असेल किंवा देशाचं राष्ट्रगीत असेल. रविंद्रनाथ टागोर यांनी देशाच्या राष्ट्रगीताबाबत अगोदरचं 1912 ते 1936 दरम्यान खुलासा केला आहे. रविंद्रनाथ टागोर यांनी सव्यासाची भट्टाचार्य यांना पत्र लिहिले आहेत. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात हे राष्ट्रगीत कोणत्याही नेत्यासाठी लिहिण्यात आलं नाही. अधिनायक म्हणजे सर्वशक्तीमान ईश्वर किवा देशातील जनता, असा अर्थ घेतला आहे. मात्र स्वातंत्र्य संग्रामात काहीही योगदान नसलेल्या काही लोकांना ही प्रतिकं नष्ट व्हावी असं वाटते. मात्र त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ठणकावलं.
हेही वाचा :
- "बांगलादेशात अन्याय होत असलेल्या हिंदूंना भारतात आश्रय द्या", महंत रामगिरी महाराजांची मागणी
- बोललो त्यावर ठाम, परिणामाची चिंता नाही; महंत रामगिरी महाराजांनी ठणकावलं - Mahant Ramgiri Maharaj Statement
- रामगिरी महाराज यांच्या समर्थनात श्रीरामपुरात रास्ता रोको; समर्थकांकडून संरक्षणाची मागणी - Ramgiri Maharaj Controversy