मुंबई-मुंबई महापालिकेचा वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केलाय. वर्ष 2024 चा अर्थसंकल्प 59,954.75 कोटी रुपयांचा आणि 58.22 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प होता. मात्र, यंदाचा अर्थसंकल्प हा 74,427.41 कोटी रुपयांचा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 14 हजार 472 कोटी 66 लाख रुपयांनी वाढलाय. तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शिल्लक रकमेत 2 कोटी 43 लाख रुपयांनी वाढवण्यात आलाय. एका बाजूला महापालिका तोट्यात असल्याच्या चर्चा असतानाच आता आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पालिका मुंबईकरांवर आणखी दोन कर लादण्याच्या तयारीत आहे.
मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही :या अर्थसंकल्पात जल आणि मल करात आणि मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असा दावा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलाय. मात्र, मुंबई महापालिकेने 2 लाख 32 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची विकासकामे, विविध नवीन कामे, योजना, सेवासुविधा मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय, आस्थापना खर्च भागविण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेतलाय. हे उत्पन्न वाढवण्यासाठी लावण्यात आलेला पहिला कर म्हणजे झोपडपट्टी व्यावसायिकांकडून वसूल केला जाणारा प्रॉपर्टी टॅक्स आहे. त्यासाठी महापालिकेने झोपडपट्टीतील हॉटेल, दुकाने, गोदामे आदी लघु उद्योगावर नजर टाकलीय. महापालिकेनं आता मुंबईतील 50 हजार झोपडपट्टीतील व्यावसायिकांकडून मालमत्ता करवसुली करण्याचा निर्णय घेतलाय. यातून पालिका प्रशासनाला 350 कोटी रुपयांची उत्पन्न मिळणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार : यातील दुसरा कर म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी होणारा मोठा खर्च पाहता महापालिका कायदेशीर सल्ल्याने मुंबईकर 'घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क' टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे. त्याचप्रमाणे विविध खात्यामार्फत आकारण्यात येणाऱ्या आकार आणि शुल्कात सुधारणा म्हणजेच वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिलेत. आता हे नवे कर पालिका केव्हापासून लागू करते हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महागाईने पिचलेल्या मुंबईकरांना या कर आणि दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांवर कर आणि दरवाढ लादल्यास त्यास राजकीय पक्षांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महापालिकेला मालमत्ता करापोटी यंदा 5 हजार 200 कोटी रुपये मिळणार आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी चालू आर्थिक वर्षात 70 कोटींचे उत्पन्न मिळाले असून, पुढील आर्थिक वर्षात आणखी 300 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
हेही वाचाः